मुंबईसाठी आता नवी रेल्वे अशक्य; सुविधांना ‘दमरे’चा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 16:54 IST2020-02-26T16:47:53+5:302020-02-26T16:54:59+5:30
नांदेड येथे रेल्वे कोचची देखभाल-दुरुस्ती, टर्मिनल सुविधांची क्षमता अतिरिक्त सीमेवर गेली आहे.

मुंबईसाठी आता नवी रेल्वे अशक्य; सुविधांना ‘दमरे’चा नकार
औरंगाबाद : नांदेड येथे रेल्वे कोचची देखभाल-दुरुस्ती, टर्मिनल सुविधांची क्षमता अतिरिक्त सीमेवर गेली आहे. एकेरी मार्गावरही पूर्वीच्या तुलनेत अधिक भार वाढला आहे. त्यामुळे मुंबईसाठी आणखी एक रेल्वे सुरू करणे अशक्य असल्याचे ‘दमरे’चे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी स्पष्ट केले.
खासदार हेमंत पाटील यांना एका पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. नांदेड-मुंबईदरम्यान सध्या ४ एक्स्प्रेस धावत आहेत, तसेच ५ साप्ताहिक रेल्वे धावतात. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यराणी एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आल्याचे सांगत गजानन मल्ल्या यांनी मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करण्यास थेट नकार दिला आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यराणी एक्स्प्रेस अखेर १० जानेवारीपासून नांदेडहून मुंबईसाठी धावत आहे. या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.