वसूली गँगचे कर्जदारांच्या संपर्कातील महिलांना धमकीचे कॉल, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:15 IST2025-09-19T12:13:46+5:302025-09-19T12:15:30+5:30
इगतपुरीमध्ये सुरू होता बोगस कॉल सेंटरचा गोरखधंदा, एका महिला वकिलाच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या सायबर पोलिसांच्या माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांंचा छापा, दोघांना अटक

वसूली गँगचे कर्जदारांच्या संपर्कातील महिलांना धमकीचे कॉल, बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश
इगतपुरी/नाशिक : कर्जवसुलीच्या नावाखाली राज्यभरातील कर्जदारांच्या आसपासच्या, संपर्कातील महिलांची इत्थंभूत माहिती गोळा करून अश्लील कॉल करून पैसे वसुलीसाठी धमकावले जात होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. एका महिला वकिलाच्या तक्रारीनंतर छत्रपती संभाजीनगर सायबर पोलिसांच्या माहितीवरून नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा गोरखधंदा उघडकीस आणला. यात कॉल सेंटर चालवणारा नरेंद्र शशिकांत भोंडवे (३२, रा. इगतपुरी) व पारस संजय भिसे (२६, रा. घाटकोपर, मुंबई) यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमधील एका ३१ वर्षीय वकील महिलेला १५ सप्टेंबर रोजी कॉल प्राप्त झाला. एका महिलेच्या कर्जाचा संदर्भ देत त्यांनी थेट धमकावणे, अरेरावी सुरू केली. महिला वकिलाने त्यांचा त्या महिलेशी व कर्जासोबत काहीच संबंध नसल्याचे सांगितले. तरीही कर्जदार महिलेला कॉल कॉन्फरन्सवर घेऊन कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी अश्लील शिवीगाळ सुरू केली. अत्यंत खालच्या स्तरावर बाेलत त्याने महिला वकिलाला धमकावणे सुरू केले. विशेष म्हणजे, वकिलांच्या घरपरिसरातील अनेक महिलांना असे कॉल आले. या प्रकारामुळे संतप्त महिलेने थेट सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्याकडे तक्रार केली. पांढरे यांनी कॉलच्या क्रमांकाची माहिती घेतली असता सर्व क्रमांक इगतपुरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पांढरे यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांना संपर्क करून सर्व माहिती पुरवली.
नाशिक ग्रामीण पोलिसांची तत्परता, तत्काळ खातरजमा करीत कारवाई
प्राप्त माहितीची खातरजमा करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सदर ठिकाणावर जात खातरजमा केली. त्यात इगतपुरीच्या मीनाताई ठाकरे संकुलात क्रेडिट कार्डच्या कर्जवसुलीसाठी अवैधरीत्या कॉल सेंटर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तेथून नरेंद्र व पारसला ताब्यात घेत मोबाइल व सीमकार्ड, असा २४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इगतपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
...असे चालते रॅकेट
-राज्यातील अनेक नामांकित बँका, पतसंस्थांद्वारे अशा बोगस कॉल सेंटरला कर्जदारांचा छळ करून कर्जवसुलीसाठी कंत्राट दिले जाते. क्रेडिट कार्डद्वारे दिले जाणारे गृह व अन्य कर्जाची वसुली करण्याकरिता कर्जदार व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सोशल मीडियावरील फ्रेंड्स यादीतील लोकांना संपर्क करतात.
-बँकेकडील बनावट ओळख दाखवत बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करीत कर्जवसुलीचे प्रयत्न केले जातात.
-कारवाई झालेल्या कॉल सेंटरमध्ये ४० ते ५० कर्मचारी काम करतात. कॉल सेंटर चालक अवैधरीत्या कर्जखातेदारांचा वैयक्तिक डेटा संकलित करून संपर्क करतात. या काॅल सेंटरला स्थानिक नगर परिषदेचा कुठलाच परवाना नसल्याचेही निदर्शनास आले.