नवी औषधी ‘क्वारंटाइन’ करून तपासणी, पण मराठवाड्यात ‘एनएबीएल’ लॅबच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:17 IST2024-12-14T16:16:14+5:302024-12-14T16:17:02+5:30
आरोग्य विभागाकडून औषधीवर खर्च, तपासणी दुसऱ्यांकडून : करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार?

नवी औषधी ‘क्वारंटाइन’ करून तपासणी, पण मराठवाड्यात ‘एनएबीएल’ लॅबच नाही
छत्रपती संभाजीनगर : राज्य पातळीवरून आरोग्य विभागाकडून सरकारी रुग्णालयांना औषधी पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधी नमुने ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या प्रयोगशाळेत पाठविली जातात. तोपर्यंत औषधी ‘क्वारंटाइन’ केली जातात. हा आतापर्यंत स्थानिक पातळीवर खरेदी केलेल्या औषधींसाठी नव्हता. मात्र, बनावट औषधींच्या प्रकारानंतर ऑगस्टपासून हा नियम स्थानिक पातळीवर खरेदी केलेल्या औषधींसाठीही लागू झाला आहे. मात्र, मराठवाड्यात ‘एनएबीएल’ मानांकन असलेल्या लॅबच नसल्याने मुंबईसह अन्य राज्यांतील लॅबवर आरोग्य विभागाला विसंबून राहावे लागत आहे.
आरोग्य विभागाकडून औषधी खरेदी करण्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, या औषधींची तपासणी स्वत: करण्यासाठी कोणतीही प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. आरोग्य विभागाकडून करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. याठिकाणी औषधींची तपासणी करण्याची यंत्रणा उभी करण्याच्या हालचाली मध्यंतरी झाल्या. परंतु यावर कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सहा वर्षांपासून ‘विशाल’कडून पुरवठा
जिल्हा सामान्य रुग्णालयाला गेल्या सहा वर्षांपासून कोल्हापूरच्या मे. विशाल एंटरप्रायजेसकडून औषधी पुरवठा होतो. तसेच त्यापूर्वीही या एजन्सीकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला औषधी पुरवठा झाल्याचे समजते.
सात प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’
जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या राज्यपातळीवरून पुरवठा झालेल्या ७ प्रकारची औषधी ‘क्वारंटाइन’ करण्यात आलेली आहे. या औषधींची नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेली आहेत.
२५७ प्रकारची औषधी खरेेदी प्रक्रिया
जिल्हा रुग्णालयात २५७ प्रकारची औषधी खरेदी प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व औषधी प्राप्त झाल्यानंतर ती क्वारंटाइन केली जातील. अहवाल आल्यानंतरच रुग्णांना दिली जातील. यास २० ते २२ दिवस लागतील.
औषधी खरेदी करताना यावर आता करडी नजर
- पॅकेजिंग.
- ‘डब्ल्यूएचओ- गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’ मानांकन.
- ‘गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’ मानांकन.
- किमान दीड वर्षांची एक्स्पायरी डेट
चारही जिल्ह्यांचा आढावा
आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येत आहे. मे. विशाल एंटरप्रायजेसने कुठे कुठे औषधी पुरवठा केला आहे, याची माहिती घेतली जात आहे.
- डाॅ. कांचन वानेरे, उपसंचालक