आत्याला भेटून परतताना भाच्याचा पैठण रोडवर अपघात; जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:25 IST2025-10-18T16:20:39+5:302025-10-18T16:25:02+5:30
दुचाकीने माळीवाडा येथील घराकडे जात असताना चितेगावजवळ दुचाकी घसरून अपघात झाला.

आत्याला भेटून परतताना भाच्याचा पैठण रोडवर अपघात; जागीच मृत्यू
दौलताबाद : आत्याला भेटून परतणाऱ्या भाच्याचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) पहाटे दोन वाजेच्या सुमारास चितेगावजवळ पैठण रोडवरील व्हिडिओकॉन कंपनीसमोर घडली. आकाश प्रकाश हेकडे (वय २१, रा. माळीवाडा, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आकाश बिडकीन येथील आत्याला भेटण्यासाठी गेला होता. भेटीनंतर तो शुक्रवारी रात्री दुचाकीने माळीवाडा येथील घराकडे जात असताना चितेगावजवळ त्याची दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी आकाशला ग्रामस्थांच्या मदतीने जगद्गुरू नरेंद्रचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या पार्थिवावर माळीवाडा येथील स्मशानभूमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आकाश हा खासगी कंपनीत काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.