सातारा देवळाईत सुविधांकडे दुर्लक्ष; खडी रोडवर नागरिकांचे चिखलात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 19:25 IST2025-05-20T19:25:17+5:302025-05-20T19:25:34+5:30
दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

सातारा देवळाईत सुविधांकडे दुर्लक्ष; खडी रोडवर नागरिकांचे चिखलात आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : देवळाई येथील खडी रोडवर गेल्या चार वर्षांत ड्रेनेज, जलवाहिनी, गॅस लाइन व विजेच्या खांबाचे काम रखडलेले आहे. रस्त्यावर उन्हाळ्यात धुळीचे लोट आणि आता अवकाळी पावसात चिखलामुळे चालणे कठीण झाले आहे. त्रस्त नागरिकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. सोमवारी सकाळी खडी रोडवर चिखलात आंदोलन करण्यात आले. या भागातील महिलांनीही आंदोलनात सहभाग घेतला. दोन दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
सातारा-देवळाईचा महापालिकेत समावेश झाल्यानंतरही या भागाला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. दरवर्षी २० कोटींपेक्षा अधिक कर भरणाऱ्या नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. देवळाई रस्त्याला समांतर रस्ता म्हणून खडी रोड ओळखला जातो. काळ्या मातीचा हा खडी रोड ६० फुटांचा व २ किलोमीटर अंतराचा आहे. हा रस्ता देवळाई गावाला जोडणारा आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती झाल्या आहेत. गृहनिर्माण सहकारी संस्था, व्यापारी संकुल, दुकाने, शाळा असल्याने हा रस्ता २४ तास वर्दळीचा आहे.
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
नुकतेच या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले होते. परंतु गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने हा रस्ता वापरणे कठीण झाले आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरू करा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे. उद्धवसेनेचे शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे पाटील, उपशहर प्रमुख दिनेश राजेभोसले, सुनील कोटकर, प्रशांत जोशी, विभाग प्रमुख संतोष बारसे, संजीवन सरोदे, नितीन झरे, उपविभाग प्रमुख प्रशांत चौधरी, शाखाप्रमुख सुनील कडवे, दत्ता लोहकरे, सचिन वाहूळ, सत्यभूषण राठोड, सुनील चव्हाण, बंडूभाऊ साळुंखे, श्रीराम धांडे, रवी मारोडकर, कृष्णा खंडागळे, हनुमंत केंद्रे, प्रवीण घाटविसावे, हनुमंत धुमाळ आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.