शरद पवारांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 11:07 IST2018-02-03T11:06:56+5:302018-02-03T11:07:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात हल्लाबोल यात्रा सुरू केली होती.

शरद पवारांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांची परवानगी
औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या औरंगाबादमधील सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात हल्लाबोल यात्रा सुरू केली होती. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मराठवाड्यात ही यात्रा काढण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या हल्लाबोल यात्रेचा शनिवारी ( 3 फेब्रुवारी) समारोप होणार आहे. यानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नियोजित सभेला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. अखेर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री उशीरा पोलिसांकडून परवानगी देण्यात आली.
दरम्यान, पवारांच्या सभेला परवानगी मिळत नसल्यानं संतप्त झालेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियोजित ठिकाणी पवार यांची सभा होणारच, असे ठणकावून सांगितले होते. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात काढण्यात आली. तुळजापूर येथून सुरू झालेली ही यात्रा आठही जिल्ह्यांत गेली. या यात्रेचा समारोप येथे होत आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास शहरातील क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या जाहीरसभेला सुरुवात होईल. दरम्यान, शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. हल्लाबोल यात्रेच्या सांगता सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख दिग्गजांची हजेरी असणार आहे. तसेच औरंगाबाद शहरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते हेदेखील सभेला उपस्थित असणार आहेत.
याआधी १६ ते २४ जानेवारी दरम्यान मराठावाड्यातील आठही जिल्ह्यात घेतलेल्या सभांना जनतेचा अभूतपुर्व असा पाठिंबा मिळाला होता. हल्लाबोल मोर्चा व सभा यशस्वी करण्यासाठी शुक्रवार पासून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी तयारीचा आढावा घेतला. सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चा व सभेला उपस्थित राहणार असल्यामुळे सरकारविरोधातला हा निर्णायक लढा असल्याचा विश्वास मराठवाड्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे.