'एनएचए'ने आधी केली चूक; नंतर मागितले १७३ कोटी! म्हणे जलवाहिनीमुळे कंत्राटदाराचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 12:55 IST2024-12-19T12:54:08+5:302024-12-19T12:55:04+5:30
नवीन पाणीपुरवठा योजनेला २०२० मध्ये शासनाने परवानगी दिली. २०२२ मध्ये नॅशनल हायवेने २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली.

'एनएचए'ने आधी केली चूक; नंतर मागितले १७३ कोटी! म्हणे जलवाहिनीमुळे कंत्राटदाराचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून नॅशनल हायवेने सुरू केले आहे. जलवाहिनी टाकण्यास विलंब झाल्याने कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १७३ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून नॅशनल हायवेला द्यावेत, अशी मागणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. नॅशनल हायवेच्या या भूमिकेमुळे मजिप्रा अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जलवाहिनीवर रस्ता तयार करून मोठी चूक करायची आणि उलट पैशांची मागणी करायची, हा काय अजब प्रकार अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेला २०२० मध्ये शासनाने परवानगी दिली. २०२२ मध्ये नॅशनल हायवेने २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली. जलवाहिनी टाकण्यासाठी मजिप्राकडून पैसेही भरून घेतले. या सर्व प्रक्रियेनंतर पैठण रस्ता चारपदरी करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केला. कंत्राटदाराने ४१ टक्के कमी दराने निविदा भरली. जलवाहिनी टाकण्याचे काम जायकवाडीपासून सुरू झाले. या कामाला विलंब झाल्याने कंत्राटदाराची यंत्रसामग्री अनेक दिवस उभी होती. त्याला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला असे कारण समोर करत नॅशनल हायवेने मजिप्राकडे १७३ कोटींची मागणी केली. मजिप्राकडून पैसे घेऊन कंत्राटदाराला देण्याचा हा डाव असल्याचे सूत्रांनी नमूद केले. जलवाहिनी एवढ्या महिन्यात टाका, असे कुठेही नॅशनल हायवेने म्हटले नाही. नियोजित वेळेतच जलवाहिनी ९५ टक्के टाकण्यात आली. उर्वरित काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण होईल. कामाला विलंबच झालेला नाही, तर नॅशनल हायवेला १७३ कोटी रुपये देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही सूत्रांनी सांगितले.