'वंदे भारत'चा नांदेड मुहूर्त ठरला'; एक दिवसात छत्रपती संभाजीनगरहून मुंबई अपडाऊन विसरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:50 IST2025-07-09T17:49:30+5:302025-07-09T17:50:20+5:30
रेल्वेची मनमानी, लोकप्रतिनिधींच्या उदासीनता; वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑगस्टपासून सुटणार नांदेडहून

'वंदे भारत'चा नांदेड मुहूर्त ठरला'; एक दिवसात छत्रपती संभाजीनगरहून मुंबई अपडाऊन विसरा
छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करून सुरू केलेली जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस अखेर २६ ऑगस्टपासून नांदेडहून धावणार आहे. ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यास आणि वेळेत बदल करण्यास तीव्र विरोध झाला. मात्र, त्यानंतरही रेल्वेचा मनमानी कारभार आणि जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यावर शिक्कामोर्तब झाले. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे. ही रेल्वे नव्या वेळापत्रकानुसार अडीच तास उशिराने सुटेल. परिणामी, शहरवासीयांना रेल्वेने एका दिवसात मुंबईला ये-जा करणे थांबणार आहे.
जनशताब्दी एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरहून जालन्यापर्यंत आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. परिणामी, छत्रपती संभाजीनगरकरांचा मुंबईला एका दिवसात ये-जा करणेच थांबले. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना एका दिवसात मुंबईला ये-जा करणे शक्य झाले; परंतु आता ही रेल्वे नांदेडपर्यंत नेली जात असल्याने मुंबईत मुक्काम करण्याचीच वेळ येईल. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याचा आणि वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याचे १२ जून रोजी समजले. मात्र, गेल्या महिनाभरात जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा अपुरा पडल्यानेच ही रेल्वे नांदेडहून २६ ऑगस्टपासून सुटण्यावर आणि वेळापत्रकातील बदलावर शिक्कामाेर्तब झाल्याची ओरड सर्वसामान्य प्रवाशांतून होत आहे.
बोगींची संख्या ८ वरून २० वर; पण...
सध्या वंदे भारत एक्स्प्रेस ही ८ बोगींची आहे. नांदेडहून सोडताना ती २० बोगींची होईल. त्यामुळे कोटा कमी होणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, ही रेल्वे सध्या छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटते आणि दुपारी ११:५५ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अशक्य आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती उपयोगी ठरणार नाही.
वेळ बदलण्यासाठी पाठपुरावा
या रेल्वेची सध्याची वेळ कायम राहावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल. बोगी वाढल्याने कोटा कमी होणार नाही, इतकाच दिलासा आहे.
- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
वेळ बदला
वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेताना जे वेळापत्रक तयार करण्यात आले, ते बदलण्याची मागणी केली जाईल. प्रवाशांना सकाळी ६ वाजता मुंबईसाठी रेल्वे उपलब्ध असावी.
- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना
वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
स्थानकाचे नाव -२६ ऑगस्टपासून आगमन/ प्रस्थान - सध्याचे आगमन/ प्रस्थान
हुजूर साहिब नांदेड - पहाटे ५ वा. -
परभणी - ५:४० वा. / ५:४२ वा.-
जालना- ७:२० वा./ ०७:२२वा.- पहाटे ५:०५ वा.
छत्रपती संभाजीनगर - ८:१३ वा./८:१५वा.- ५:४५वा./५:५० वा.-
अंकाई ९:४० वा. - ७:२५ वा.
मनमाड जंक्शन ९:५८ वा./ १०:०३वा.- ७:३८ वा./७:४० वा.
नाशिक रोड - ११ वा./ ११:०२ वा.-८:३५ वा./८:३७ वा.
कल्याण - १:२० वा. / १:२२ वा.-१०:५५ वा/१०:५७ वा.
ठाणे - १:४० वा. /१:४२वा.- ११:१० वा/११:१२ वा.
दादर - २:०८ वा./ २:१०वा.- ११:३२ वा/११:३४ वा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई २:२५ वा- ११:५५ वा.