नागसेन फेस्टिव्हलची दशकपूर्ती; यंदा अभिनेते चेतन कुमार यांच्या हस्ते उद्घाटन, पहा वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:41 IST2026-03-24T12:40:41+5:302026-03-24T12:41:22+5:30
नागसेन फेस्टिव्हल विशेष; दक्षिण भारतीय 'पाराई' वाद्य आणि रॅमन मॅगसेसे विजेते बेजवाडा विल्सन यांचे मार्गदर्शन

नागसेन फेस्टिव्हलची दशकपूर्ती; यंदा अभिनेते चेतन कुमार यांच्या हस्ते उद्घाटन, पहा वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर : नागसेन फेस्टिव्हलच्या दशकपूर्ती सोहळ्याची सुरुवात २९ मार्चपासून होणार असून, कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चेतन कुमार (अहिंसा) यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे.
नागसेनवनातील लुम्बिनी उद्यानात २९ ते ३१ मार्चपर्यंत रोज सायंकाळी ६ ते १० या वेळेत हा महोत्सव होईल. पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभानंतर दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश हे ‘बहुजनांच्या शैक्षणिक नाकेबंदीचे राष्ट्रीय षडयंत्र’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत, तर ‘मार्मिक’ या व्यंगचित्र मासिकाचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर नितीन गायकवाड प्रस्तुत ‘भीमस्मरण’ हा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. यावेळी मुरलीधर ताकवाले हे क्लॅरिओनेट या वाद्यावर भीमगीतांचे सादरीकरण करतील.
दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी ‘आडवी आर्ट, बंगळुरू’ यांच्या वतीने दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये दलितांच्या सामाजिक समता आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जाणारे ‘पाराई’ हे वाद्य १२ कलावंतांच्या समूहाद्वारे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून देशातील शैक्षणिक व सामाजिक मुद्यांवर भाष्य करणाऱ्या युवा पत्रकारांचा ‘नव माध्यमातील आंबेडकरी पत्रकारितेचे वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात देशभरातील नवपत्रकार सुमित चौहान (दिल्ली), साहिल वाल्मिकी (नोएडा), हितेश कुमार (दिल्ली), राज असरोडकर (उल्हासनगर), राहुल डोंगरे (नागपूर) आणि मनीष सागर (मनाली) सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘एल्गार समतेचा’ हे कवी संमेलन पार पडणार आहे. यासाठी विशेष अतिथी म्हणून ‘कौन जात हो भाई’ या प्रसिद्ध कवितेचे रचनाकार युवा कवी बच्चालाल उन्मेष (बनारस), डॉ. अनिकेत खांडकर (मुंबई), गिरीश खोब्रागडे (यवतमाळ) आणि रमेश बुरबुरे (गडचिरोली) उपस्थित राहणार आहेत.
फेस्टिव्हलच्या समारोपप्रसंगी ३१ मार्च रोजी ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार प्राप्त सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेजवाडा विल्सन हे ‘तंत्रज्ञानाचा बुरखा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा चेहरा : भारताचं जात वास्तव’ या विषयावर भाष्य करतील. सत्राच्या अध्यक्षस्थानी अभिनेते व लेखक मिलिंद शिंदे असतील. त्यानंतर ‘जल्लोष भीमजयंतीचा’ या विशेष सत्रात प्रांजल सुरडकर, रिदम रिव्होल्यूशन संघाचा फ्लॅश मॉब, विपीन तातड आणि टीम यांचे रॅप सादरीकरण होईल. तसेच VIP श्रावस्ती आणि हरीश कांबळे हे देखील रॅप सादर करतील. तर लिटिल स्टार अरहं वाळके हा बाल कलाकार भीमगित सादर करणार आहे.
स्वाक्षरी मोहीम
फेस्टिव्हलच्या तिन्ही दिवसांत महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भेदभावाच्या विरोधात ‘रोहित ॲक्ट’च्या धर्तीवर कडक कायदा करावा, तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची शिफारस करणारा बदर समितीचा अहवाल फेटाळून उपवर्गीकरण रद्द करावे, या मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. संकलित स्वाक्षऱ्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
व्यंगचित्र प्रदर्शन
नागसेन फेस्टिव्हल अंतर्गत मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन आणि ‘कंबाईन कार्टूनिस्ट’ या व्यंगचित्रकार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही, संविधान, शैक्षणिक क्षेत्रातील भेदभाव, हुकूमशाही अशा विविध विषयांवर परखड व मिश्किल भाष्य करणारे महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन तिन्ही दिवस आयोजित करण्यात येणार आहे.
मिलिंद सन्मान पुरस्काराची घोषणा
समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नागसेन फेस्टिव्हल समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘मिलिंद सन्मान पुरस्कार’ यंदा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हर्सूल कारागृह येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन डोंगरे, विधी क्षेत्रातून ॲड. अभय भोसले, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. मनोज भुक्तार व डॉ. महेंद्र गायकवाड, संशोधन क्षेत्रातून अभिजित वाघरे, शैक्षणिक उपक्रमांतर्गत ‘बिन छताची शाळा’ या उपक्रमाचे भगवान सदावर्ते, कला क्षेत्रातून नंदकुमार जोगदंड तसेच लेणी संवर्धन व धम्म कार्यासाठी सूरज जगताप, क्रीडा संघटक म्हणून सुदंर घाटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या उपक्रमांना आजी-माजी विद्यार्थी, नागरिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिन निकम, हेमंत मोरे, ऍड.सुनील मगरे, प्रा.मिलिंद मनवर, मेघानंद जाधव, के.एम बनकर, प्रा प्रबोधन बनसोडे, अविनाश कांबळे, राष्ट्रपाल गवई, कुणाल भालेराव, रत्नदीप रगडे, सिद्धार्थ दिवेकर आदींनी केले आहे.