'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:17 IST2025-03-18T17:16:48+5:302025-03-18T17:17:37+5:30
मनोज जरांगे यांची फडणवीस सरकारवर वेरूळ येथून कडाडून टीका

'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकार जातीय दंगली घडवतेय. नागपूर दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मंगळवारी वेरूळ येथे माध्यमांशी बोलतांनी केली आहे.
वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगे हे वेरूळ येथे आज आले होते. सोमवारी रात्री नागपूर येथे दोन समाजात झालेल्या राड्यामुळे पोलीस हाय अलर्टवर आहेत. याबाबत जरांगे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकार सर्व परिस्थितीस जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. जरांगे म्हणाले की, मॉ जिजाऊ व छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे कोरटकर, सोलापूरकर यांना का अटक केली नाही? असा सवाल करत जरांगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच नागपूरमध्ये सोमवारी रात्री राडा झाला. यावर देखील टीका करत ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व घडवले जात आहे, असा हल्लाबोल जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
दोन्ही सरकार तुमचे
दरम्यान, केंद्र व राज्य सरकार तुमचे असून औरंगजेब कबर तुम्ही काढायची तर काढू शकता. मात्र सरकारला राज्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दंगली घडवायच्या आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंग
दरम्यान, औरंगजेब प्रकरणावरून देशभरात मोठा गदारोळ होत असून कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यामुळे खुलताबाद शहरात औरंगजेब कबर परिसरातील दर्गेला चोहोबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बॅरीकेट लावून प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची आणि नागरिकांची चौकशी पोलीस करत आहेत. औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे नाव नंबर, आधार कार्ड तपासले जात असून त्याची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.