‘माझ लासूर सुंदर लासूर’ व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून गावकऱ्यांचा समस्यांवर प्रहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 20:22 IST2019-01-07T20:22:13+5:302019-01-07T20:22:47+5:30
गावातील समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.

‘माझ लासूर सुंदर लासूर’ व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून गावकऱ्यांचा समस्यांवर प्रहार
- विनोद जाधव
लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : व्हॉट्स अॅपवरील ‘माझ लासूर सुंदर लासूर’ या ग्रुपमुळे येथील ग्रामपंचायतीला भर थंडीतही चांगलाच घाम फुटत आहे. या ग्रुपवर ग्रामस्थांकडून होणाऱ्या सार्वजनिक समस्यांचे निराकरण करताना ग्रामपंचायतीची मोठी दमछाक होत आहे. तर, समस्या सोडविल्यानंतर ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुकही होत आहे. पथदिवे, साफसफाई यासारखी किरकोळ कामे करून घेण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायतीऐवजी या ग्रुपवर पोस्ट करून समस्या सोडवून घेत आहेत.
एरव्ही कंटाळवाणा वाटणारा सोशल मिडीया या ग्रुपमुळे समस्या सोडविण्याचे प्रभावी माध्यम होऊ पाहात आहे. लासूर स्टेशन येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार व प्रतिष्ठित ग्रामस्थांचा समावेश असलेल्या या ग्रुपमध्ये सर्व मिळून दोनशे पंचावन्न लोकांचा समावेश आहे. त्यामुळे या ग्रुपवर पडलेल्या प्रत्येक पोस्टला जबाबदार लोक बघत असल्याने संबंधितांची चांगलीच गोची होते. गावातील समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीशी संबंधित साफसफाई, नाले सफाई, पथदिवे, प्रशासकीय कामकाजात होणारी हयगय हे मुख्य विषय करून ग्रामस्थ ग्रामपंचायतीला ग्रुपवर माहिती देऊन त्याचे निराकरण करण्यासाठी सुचवतात. तेथून पुढे वातावरण तापायला चांगलीच सुरूवात होते. दरम्यान, अनेक जण यात सहभाग घेऊन मत नोंदवतात तर काही जण नुसतीच बघ्याची भूमिका घेतात. काही समस्या सुटतात तर काही समस्यांमुळे ग्रामपंचायतीची चांगलीच गोची होऊन जाते. या ग्रुपमुळे सध्याच्या कडाक्याच्या थंडीतही ग्रामपंचायतीला चांगलाच घाम फुटत असल्याचे दिसून येत आहे.