प्रत्यक्ष वाद्यातून निर्माण झालेले संगीत हृदयाचा ठाव घेते: पद्मविभूषण डॉ. इलायाराजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:54 IST2026-01-29T19:54:00+5:302026-01-29T19:54:31+5:30

अकराव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मविभूषण इलायाराजा यांना पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित केले.

Music created from real instruments speaks to the heart: Padma Vibhushan Dr. Ilayaraja | प्रत्यक्ष वाद्यातून निर्माण झालेले संगीत हृदयाचा ठाव घेते: पद्मविभूषण डॉ. इलायाराजा

प्रत्यक्ष वाद्यातून निर्माण झालेले संगीत हृदयाचा ठाव घेते: पद्मविभूषण डॉ. इलायाराजा

छत्रपती संभाजीनगर : संगीतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. यंत्रावर बोटे फिरवून संगीत दिले जाते. त्यात तांत्रिकता येते. ते संगीत कानापर्यंत पोहोचते. मात्र, सगळ्या वादकांनी प्रत्यक्ष वाद्य वाजवून निर्माण केलेले संगीत तुमच्या कानापर्यंतच पोहोचत नाही, तर तुमच्या हृदयाचा ठाव घेते, असे प्रतिपादन ज्येष्ठ भारतीय संगीतकार पद्मविभूषण डॉ.इलायाराजा यांनी केले.

अकराव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी (दि.२८) सायंकाळी साध्या पद्धतीने करण्यात आले. यावेळी भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मपाणी पुरस्काराने पद्मविभूषण इलायाराजा यांना सन्मानित केले. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजक रसूल पुक्कुट्टी, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, संयोजक नीलेश राऊत, सचिन मुळे, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी इलायाराजा म्हणाले, संगीताच्या विद्यार्थ्यांनी यंत्रावर वाद्य वाजविण्यापेक्षा प्रत्यक्ष वाद्य शिकली पाहिजेत. वाद्य शिकले नाही, तर ऐतिहासिक परंपरा असलेल्या भारतीय वाद्याला पुढे घेऊन कोण जाणार? असा सवाल उपस्थित केला. माझ्या संगीतामध्ये सर्व काही लाइव्ह वाद्य, वादक असतात. त्या ठिकाणी आम्ही काढलेल्या नोट्सच्या आधारे वाद्य साथ देतात. आमच्या आर्केस्ट्रामध्ये ८८ वादक आहेत. जेव्हा संगीत दिले जाते, तेव्हा त्यात वादक वाद्यांच्या आधारे त्यात जीव ओतत असतात. त्यातून संगीतात जिवंतपणा येतो. तो जिवंतपणा इलेक्ट्रिक वाद्यात नसतो, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप अंकुशराव कदम यांना केला. रसूल पुक्कुट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक सुनील सुकथनकर यांनी केले. कार्यक्रमात अभिनेत्री भाग्यश्री बोरसे हिचा दाक्षिणात्य चित्रपटातील कारकिर्दीसाठी विशेष सन्मान करण्यात आला.

१,५४५ चित्रपटांना संगीत तरीही शिक्षण सुरूच
आज विमानात बसण्यापूर्वी १,५४५व्या चित्रपटाला संगीत देऊन आलो आहे. एवढ्या चित्रपटांना संगीत दिले असले, तरी आणखी शिक्षण सुरूच असल्याचे इलायाराजा यांनी सांगितले. यावेळी सभागृहातील एका तमिळी रसिकाने त्यांना गीत सादर करण्याचे साकडे घातले. तेव्हा त्यांनी संस्कृत पद म्हटले.

अजित पवार यांच्या निधनाचे सावट
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातात झालेल्या निधनाचे सावट होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. त्याशिवाय कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन कोणाचाही सत्कार करण्यात आला नाही. देश-विदेशातील १०० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहिल्यामुळे महोत्सव स्थगित करता आला नाही, असेही संयोजकांनी सांगितले.

Web Title : लाइव संगीत दिल को छूता है: पद्मविभूषण डॉ. इलैयाराजा

Web Summary : डॉ. इलैयाराजा ने तकनीक की तुलना में लाइव वाद्ययंत्रों की भावनात्मक गहराई पर जोर दिया। उन्होंने पारंपरिक वाद्ययंत्र सीखने के महत्व को रेखांकित किया और अजंता-एलोरा फिल्म समारोह की सराहना की, जिसमें उनके ऑर्केस्ट्रा के 88 संगीतकारों और 1,545 फिल्मों के स्कोर करने के बावजूद उनकी चल रही संगीत शिक्षा का उल्लेख किया गया।

Web Title : Live music touches the heart: Padmavibhushan Dr. Ilaiyaraaja at festival.

Web Summary : Dr. Ilaiyaraaja emphasized live instruments' emotional depth versus technology. He highlighted the importance of learning traditional instruments and praised the Ajanta-Ellora film festival, mentioning his orchestra's 88 musicians, and his ongoing musical education despite scoring 1,545 films.