शेतातील रस्त्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून; दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 12:06 IST2021-06-28T12:04:12+5:302021-06-28T12:06:50+5:30

घारदोन शिवारातील गट क्रमांक ७८ मध्ये माणिकराव नवपुते यांची शेती आहे.

Murder of an elderly farmer over a farm road dispute | शेतातील रस्त्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून; दोघे अटकेत

शेतातील रस्त्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून; दोघे अटकेत

ठळक मुद्देया प्रकरणी दोन आरोपी अटकेत घारदोन येथील शनिवारी रात्रीची घटना

औरंगाबाद : शेतात जाणाऱ्या रस्त्यावरून ट्रॅक्टर नेल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी घरात शिरून ६५ वर्षीय माणिकराव नवपुते या वृद्ध शेतकऱ्याचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घारदोन शिवारात घडली. चिकलठाणा पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

घारदोन शिवारातील गट क्रमांक ७८ मध्ये माणिकराव नवपुते यांची शेती आहे. बाजूला त्यांचा पुतण्या श्रीराम जनार्दन नवपुते व भास्कर भुजंगराव नवपुते यांचे शेत आहे. माणिकराव नवपुते यांना शेतात जाण्यासाठी श्रीराम व भास्कर यांच्या शेतातून रस्ता आहे. माणिकराव नवपुते यांचा थोरला मुलगा गोरख याने शेतात सरकी लावण्यासाठी ट्रॅक्टर आणले होते. त्याला शेतातील रस्त्यावरून जाण्यास श्रीराम व भास्करने मज्जाव केला. श्रीरामचा मुलगा रवी याने ट्रॅक्टरचालक गोरख यास शिवीगाळ केली. दरम्यान, रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रीराम नवपुते, भास्कर नवपुते, रवी श्रीराम नवपूते, बद्रीनाथ जनार्दन नवपूते, अमोल बद्री नवपुते, हरी बाबूराव नवपुते, राम बाबूराव नवपुते, बापू भुजंगराव नवपुते, शोभाबाई श्रीराम नवपुते, मंगल बद्रीनाथ नवपुते, नंदा भास्कर नवपुते, मंगल बाबूराव नवपुते यांनी घरात शिरून माणिक व त्यांचा धाकटा मुलगा विक्रम यांना शिवीगाळ करत बैलगाडीच्या लोखंडी शिवळने (गज) मारहाणीला सुरुवात केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या माणिक यांचा थोरला मुलगा गोरख, सून वर्षा त्यांनादेखील जमावाने मारहाण केली.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल साहेब, सहायक निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार प्रदीप ठुबे, अंमलदार करंगळे, शिंदे, देशमुख, टीमकीकर, डकले आदींनी घारदोनकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी श्रीराम नवपुते आणि भास्कर नवपुते यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे तपास करीत आहेत.

लोखंडी शिवळने केले प्रहार
घरासमोर जमलेला जमाव पाहून माणिकराव नवपुते हे घरातून बाहेर आले. तेव्हा संतप्त जमावाने त्यांच्या डोक्यात व कपाळावर लोखंडी शिवळने प्रहार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. नातेवाइकांनी त्यांना तत्काळ जखमी अवस्थेत घाटीत दाखल नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेत त्यांचा मोठा मुलगा गोरख व विक्रम हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Murder of an elderly farmer over a farm road dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.