छत्रपती संभाजीनगरात नशेखोरीतून हत्याकांड, तरुणाला मित्रानेच चाकू खुपसून संपवलं
By सुमित डोळे | Updated: May 24, 2025 19:59 IST2025-05-24T19:58:24+5:302025-05-24T19:59:26+5:30
पोलिस श्वान पथकाने घटनास्थळापासून माग काढला अन् काही अंतरावर मारेकऱ्याची दुचाकी सापडली.

छत्रपती संभाजीनगरात नशेखोरीतून हत्याकांड, तरुणाला मित्रानेच चाकू खुपसून संपवलं
छत्रपती संभाजीनगर : जिन्सी भागातील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, अवघ्या महिन्याभरात उस्मानपुऱ्यातील कबीरनगर परिसरात पुन्हा एक धक्कादायक हत्या घडली आहे. नशेखोरीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घटनेमुळे शहर पुन्हा हादरले आहे. आज, शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रेल्वेरुळाशेजारील एका पडक्या इमारतीच्या मैदानात राजन प्रल्हाद काकडे (२२) या तरुणाची त्याच्याच मित्राने छातीत चाकू खुपसून हत्या केली.
राजन आपल्या कुटुंबासह कबीरनगरमध्ये वास्तव्यास होता. तो दुपारी १ वाजता घराबाहेर पडला होता. सुमारे २ वाजेच्या सुमारास परिसरातील काही मुले क्रिकेट खेळण्यासाठी त्या मैदानात गेली असता, त्यांनी राजनला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले पाहिले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. रणजित पाटील, सातारा पोलीस निरीक्षक संग्राम ताठे, उस्मानपुरा निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक अमोल कामठे, दिलीप बचाटे, नंदकिशोर भंडारे आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासातच राजनचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला.
श्वानाने काढला माग
पोलिस तपासात ही हत्या नशेखोरीच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजनची हत्या परिचयातीलच एका तरुणाने केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पोलिस श्वान पथकाने घटनास्थळापासून राजनच्या चपलांपर्यंतचा माग घेतला आणि त्यानंतर काही अंतरावर मारेकऱ्याची दुचाकी सापडली. पोलिसांनी ती दुचाकी जप्त केली आहे. सतनाम नावाच्या तरुणावर संशय असून, त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.