मनपा कर्मचारी गेला जिवानिशी; २ दिवसांनंतरही छत्रपती संभाजीनगरातील होर्डिंग्ज टांगलेलेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 19:51 IST2026-02-24T19:48:40+5:302026-02-24T19:51:55+5:30
शहरात विजेचे खांब, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच धोकादायक आणि अतिजोखमीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

मनपा कर्मचारी गेला जिवानिशी; २ दिवसांनंतरही छत्रपती संभाजीनगरातील होर्डिंग्ज टांगलेलेच
छत्रपती संभाजीनगर: अनधिकृत होर्डिंग काढताना शनिवारी मनपाचे कर्मचारी अमोल जाधव यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेला उलटून तीन दिवस उलटले तरी महापालिकेकडून ठोस पाऊल उचलले जात नसल्याचे चित्र आहे.
शिवजयंतीपूर्वी मनपा आयुक्तांनी दोन दिवसांत होर्डिंग काढून घेतले जातील, असे जाहीर केले, महापौरांनी तर सरसकट होर्डिंग्ज काढून टाका, अशी भूमिका घेतली. प्रत्यक्षात मनपा पुढाकार घ्यायला तयार नाही. सोमवारी सायंकाळी प्रशासनाने होर्डिंग लावणाऱ्यांना आणखी २४ तासांची मुदत दिली. शहरात विजेचे खांब, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी तसेच धोकादायक आणि अतिजोखमीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. हे फलक संबंधितांनी २४ तासांत काढून घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
होर्डिंग स्वतःहून काढून न घेतल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २४४ व २४५ तसेच अनधिकृत होर्डिंग किंवा बॅनरमुळे कोणतीही जीवितहानी, अपघात किंवा सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाल्यास संबंधित व्यक्ती/संस्था यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ज्यांनी हे होर्डिंग्ज सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. ते संबंधितांनी काढून घ्यावेत, असे आवाहन मनपा सतत करत असली तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही.
सोमवारी शहरातील टीव्ही सेंटर, एम-२ रोड, जळगाव रोड, हडको कॉर्नर, हसूल टी पॉइंट, जटवाडा रोड, चिकलठाणा, बीड बायपास, रेल्वेस्टेशन, महावीर चौक, जालना रोड, क्रांती चौक, उस्मानपुरा, पड़ेगाव रोड आदी भागांत अनधिकृत होर्डिंग्ज झळकत होते.
'शॉक'ची भीती
वॉर्ड कार्यालयांनी शहरात अनधिकृत होडिंग हटवण्याची मोहीम हाती घेतली तरी सफाई कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेची साधने नाहीत. काही होडिंग मनपाचे पथदिवे, काही महावितरणच्या पोलला लटकलेले असतात. चतुर्थ श्रेणी कर्मचारी होडिंग काढण्यासाठी सावध पवित्रा घेत आहेत.
कारवाई का नाही?
अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची घोषणाही मनपाने केली होती. मागील तीन दिवसांमध्ये होर्डिंग न काढणाऱ्यांवर मनपाने कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील प्रमुख 66 चौकातील बहुतांश होडिंग्ज संबंधितांनी काढून घेतले आहेत. आणखी काही लहान-मोठे होडिंग्ज दिसून येत असून, ते सुद्धा काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. होडिंग कोणाचे, हे बघितले जाणार नाही. माझ्या फोटोचे होर्डिंग असतील, तर ते अगोदर काढा; असे मी यापूर्वीच सांगितले. काही दिवसांमध्ये शहर होडिंगमुक्त दिसेल.
- समीर राजूरकर, महापौर
थेट गुन्हे दाखल करु
आमच्या 66 मृत्यू झालट आम्ही कोणाला ही सोडणार नाही. अजूनही अनधिकृत होर्डिंग्ज दिसत आहेत. काहींनी स्वतःहून काढून घेतले. ज्यांनी लावले, त्यांनीच ते धोकादायक होर्डिंग्ज काढून घ्यावेत. संबंधितांना आणखी एक २४ तासांची शेवटची संधी दिली जात आहे. त्यांनी नाही काढले तर आम्ही गुन्हे दाखल करू. जी. श्रीकांत, आयुक्त, मनपा.
या घोषणांचे काय झाले?
दि. १६ फेब्रुवारी २०२६
महापौरः आयुक्तांना हात जोडून विनंती करतो अनधिकृत होडिंग्ज काढून टाका. महापालिका आयुक्तः बॅनर काढायला गेले तर काढू नका म्हणून फोन व धमक्याही येतात.
दि. २१ फेब्रुवारी २०२६
महापौरः अनधिकृत होर्डिंग्जबाबत आता झीरो टॉलरन्स धोरण राहिल. महापालिका आयुक्तः अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यावर गुन्हे दाखल करु.