पडेगाव, मिटमिटात ४३ वर्षांनंतर हातोडा; लाखावर लोकसंख्या गेल्यानंतर मनपाचे उघडले डोळे

By विकास राऊत | Updated: July 4, 2025 20:25 IST2025-07-04T20:16:24+5:302025-07-04T20:25:02+5:30

तीन विकास आराखडे आजवर झाले असतील. त्यानुसार मागेच कारवाई झाली असती तर एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या नसत्या.

Municipal Corporation's eyes opened after population crossed one lakh; Action taken after 43 years in Padegaon, Mitmita areas | पडेगाव, मिटमिटात ४३ वर्षांनंतर हातोडा; लाखावर लोकसंख्या गेल्यानंतर मनपाचे उघडले डोळे

पडेगाव, मिटमिटात ४३ वर्षांनंतर हातोडा; लाखावर लोकसंख्या गेल्यानंतर मनपाचे उघडले डोळे

छत्रपती संभाजीनगर : पडेगाव, मिटमिटा परिसर महापालिका हद्दीत १९८२ साली आला. दि. ८ डिसेंबर १९८२ रोजी महापालिकेची स्थापना झाल्यानंतर लगतचे १८ खेडी पालिका हद्दीत आले. त्यात पडेगाव आणि मिटमिटा या गावांचादेखील समावेश आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेली ही गावे ग्रामपंचायतीमध्ये होती. मनपा हद्दीत ही दोन्ही गावे आल्यानंतर ४३ वर्षांत त्या गावांची लोकसंख्या एक लाखाहून पुढे गेल्यानंतर आता कुठे विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेचे डोळे उघडले.

समृद्धी महामार्ग आणि सोलापूर-धुळे हायवे होण्यापूर्वी शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी पडेगाव-मिटमिटामधून हाच प्रमुख मार्ग होता. वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, कन्नड ते चाळीसगावमार्गे धुळ्याकडे जाण्यासाठी पडेगाव ओलांडून जावे लागत असे. मनपावर १९८२ ते १९८८ पर्यंत प्रशासक हाेते. प्रशासकराज १९८८ साली संपल्या पहिल्या निवडणुकीत पडेगाव हा एकमेव वॉर्ड होता. २०१५ साली झालेल्या निवडणुकीत पडेगाव आणि मिटमिटा हे स्वतंत्र वॉर्ड होते. ४३ वर्षांत गावांचे शहरात रूपांतर झालेला हा परिसर सध्या समृद्धी महामार्ग, सोलापूर धुळे हायवे, वाळूज औद्योगिक वसाहतीलगतचा मध्यवर्ती भाग आहे.

अपघातांचा मार्ग म्हणून चर्चेत
अलीकडच्या काळात जडवाहतुकीला पर्यायी मार्ग सुरू झाल्यामुळे पडेगाव ते मिटमिटा या रस्त्यावर होणारे अपघात कमी झाले आहेत. मागील वर्षभरात तीन मोठे अपघात झाले. यात दोघांचा मृत्यू झाला. किरकोळ अपघातांची संख्या तर मोठी आहे.

पडेगाव वॉर्डामध्ये किती वसाहती
रामगोपालनगर, माजी सैनिक कॉलनी, देवगिरी व्हॅली, चिनार गार्डन, फिरदौस गार्डन, गुलमोहर कॉलनी, कादरी हॉस्पिटल परिसर, प्रिया कॉलनी, पावर हाऊस, चेतननगर, सुंदरनगर, मीरानगर या वसाहती आहेत, तर मिटामिटा वॉर्डात बकतुलनगर, तारांगण, आर्चअंगण, मिस्बाह कॉलनी, मच्छिंद्रनाथ मंदिर परिसर, अप्पावाडी, शरणापूर फाटा परिसर येतो. या भागातील नागरी वसाहतींना शहरात येण्यासाठी विद्यमान रस्ता एकमेव आणि सोयीचा आहे. २० ते २२ वसाहतींमधील वाहनांचे दळणवळण वाहतुकीच्या कोंडीतून येथे नित्याचे आहे.

एक्सपर्ट काय म्हणतात
शहरात प्रवेश करणारा तो महत्त्वाचा रस्ता आहे. ४३ वर्षांनंतर मनपाने कारवाई केली आहे. ही कारवाई मागेच करणे अपेक्षित होते. तीन विकास आराखडे आजवर झाले असतील. त्यानुसार मागेच कारवाई झाली असती तर एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या नसत्या. आता लोकसंख्या लाखाच्या पुढे गेली असेल. अतिक्रमणांवर कारवाई व्हावी, तर मालकी असलेल्यांना मनपााने टीडीआर, एफएसआय द्यावा.
-जयंत खरवडकर, सेवानिवृत्त मनपा अधिकारी

Web Title: Municipal Corporation's eyes opened after population crossed one lakh; Action taken after 43 years in Padegaon, Mitmita areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.