थकीत कर वसुलीसाठी मनपाचा मोठा निर्णय; रजिस्ट्रीपूर्वी ‘मनपा’चे बेबाकी घ्यावे लागणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:25 IST2025-08-01T15:20:11+5:302025-08-01T15:25:01+5:30
आता दस्त नोंदणीपूर्वी पालिकेचे बेबाकी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक

थकीत कर वसुलीसाठी मनपाचा मोठा निर्णय; रजिस्ट्रीपूर्वी ‘मनपा’चे बेबाकी घ्यावे लागणार
छत्रपती संभाजीनगर : महापालिका थकीत कर वसूल करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहे. त्यानुसार रजिस्ट्री कार्यालयात मालमत्तांची खरेदी-विक्री, तारण आदी व्यवहार करताना मनपाचे बेबाकी प्रमाणपत्र बंधनकारक करावे. असा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. त्यानुसार नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दस्त नोंदणीपूर्वी पालिकेचे बेबाकी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे आदेश काढले.
यासंदर्भात कर निर्धारक व संकलक तथा उपायुक्त विकास नवाले यांनी सांगितले, दस्त नोंदणी कार्यालयामार्फत करण्यात येत असलेल्या दस्त नोंदणीसाठी मालमत्ता कर, पाणीपट्टी भरणा पावती किंवा बेबाकी प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात यावे. याबाबत प्रशासक जी. श्रीकांत यांनी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांना आवाहन केले होते. त्याला मुद्रांक विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.