महापालिकेने ४ हजार मालमत्ता पाडल्या; आता मोर्चा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळांकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:14 IST2025-07-25T17:13:32+5:302025-07-25T17:14:39+5:30
चिकलठाण्यात नागरिकांनी पुढाकार घेत स्वतः होऊन एका धार्मिक स्थळाची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेने ४ हजार मालमत्ता पाडल्या; आता मोर्चा सरकारी कार्यालय, धार्मिक स्थळांकडे
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य व सेवा रस्त्यांमधील चार हजारांपेक्षा जास्त मालमत्ता महापालिकेने पाडल्याने रस्ते मोकळे झाले असले तरी सात रस्त्यांवर ३८ धार्मिक स्थळे असून, त्यांच्या रस्त्यात बाधित होणाऱ्या जागा संबंधितांनी मोकळ्या कराव्यात, यासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. शुक्रवार २५ जुलै रोजी वक्फ बोर्डासोबतच दोन धार्मिक स्थळांच्या ठिकाणी बैठका घेतल्या जाणार आहेत. चिकलठाण्यात नागरिकांनी पुढाकार घेत स्वतः होऊन एका धार्मिक स्थळाची जागा देण्याचा निर्णय घेतला. हाच आदर्श संपूर्ण शहरातील धार्मिक स्थळांशी निगडितांनी घेतला तर रस्ते मोकळे होतील.
महापालिकेने रस्ता रुंदीकरणाची मोहीम बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा, जळगाव रोडवर, व्हीआयपी रोड, रेल्वेस्टेशन रोडवर राबविली. आता धार्मिक स्थळे व सरकारी कार्यालयांच्या जागांबाबत तोडगा काढण्यात येणार आहे. असे सूत्रांनी सांगितले.
सरकारी कार्यालयांना नोटिसा देणार
काही सरकारी कार्यालयांच्या जागा मुख्य रस्त्यांमध्ये बाधित होत आहेत. वॉर्ड कार्यालयांमार्फत सरकारी कार्यालयांची यादी तयार केली असून, नियमानुसार त्या जागा ताब्यात घेण्यासाठी नोटिसा बजावल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले.