समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:50 IST2025-09-10T16:03:45+5:302025-09-10T16:50:22+5:30

समृद्धी महामार्गावरील खिळ्यांबाबत एमएसआरडीसीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

MSRDC explanation regarding the nails on Samruddhi Highway | समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण

समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण

Samruddhi Highway: मुंबई ते नागपूरला जोडणारा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा उद्धाटनापासूनच सातत्याने चर्चेत आहेत. या नवीन महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून अनेकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. या महामार्गाच्या बांधकामावरूनही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अशातच समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे काही गाड्यांचे टायर फुटल्याने चालकांनी संताप व्यक्त केला. तसेच काही घातपात घडवण्यासाठी खिळे ठोकण्यात आले का असाही प्रश्न विचारला जात होता. मात्र आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. रस्त्यावर लावलेल्या खिळ्यांमुळे काही वाहनांचे टायर पंक्चर झाले. यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. समृद्धी महामार्गावर खिळे ठोकण्यात आले नसल्याचे एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आलं. रस्त्यावरील सूक्ष्म तडे भरताना वापरण्यात आलेले ‘अॅल्युमिनिअम नोजल्स' लावण्यात आल्याचे एमएसआरडीसीने सांगितले.

एमएसआरडीसीचे स्पष्टीकरण

"हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग येथे (साखळी क्रमांक ४४२+४६०) वरील मुंबई मार्गीकेवर पहिल्या व दुसऱ्या लेनमध्ये साधारण १५ मीटर लांबीमध्ये सूक्ष्म तडे (Minor Cracks) आढळल्याने देखभाल व दुरुस्ती अंतर्गत Preventive Maintenance Measures म्हणून Epoxy Grouting द्वारे सूक्ष्म तडे (Minor Cracks) भरण्याचे काम करण्यात आलेले आहे. सूक्ष्म तडे (Minor Cracks) भरण्याचे काम करत असताना अॅल्युमिनिअमचे नोजल्स फिक्स करावे लागतात. काम करते वेळेस (Traffic Diversion) व्यवस्था करण्यात आली होती. दि. ०९/०१/२०२५ रोजी रात्री ११:३० वाजता काम पूर्ण झाले. त्यानंतर वेगाने येत असलेली काही वाहने पहिल्या लेनमध्ये डायव्हर्जन ओलांडून नोजल्स वरुन गेल्यामुळे ३ गाड्यांचे टायर पंक्चर झाल्याची घटना दि. १०.०९.२०२५ रोजी रात्री १२:१० मिनिटाच्या सुमारास झाली. त्यानंतर वाहतूक नियंत्रण कक्षाला संदेश मिळाल्यानंतर महामार्ग गस्त वाहन (RPV) रात्री १२:३६ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले होते. या ठिकाणी कोणताही अपघात अथवा जिवित हानी झालेलो नाही. Epoxy grouting साठी लावण्यात आलेले अॅल्युमिनिअमचे नोजल्स दि. १०,०१,२०२५ रोजी सकाळी ०५:०० वाजता काढण्यात आले असून सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत चालू आहे. सदर ठिकाणी Traffic Diversion ची सर्व समावेशक सुरक्षा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे," अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Web Title: MSRDC explanation regarding the nails on Samruddhi Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.