महावितरणचा ग्राहकांना शॉक; मराठवाड्यात १३ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:59 IST2021-02-05T13:57:49+5:302021-02-05T13:59:47+5:30
थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई

महावितरणचा ग्राहकांना शॉक; मराठवाड्यात १३ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित
औरंगाबाद : महावितरणने मराठवाड्यात तब्बल १३ लाख ९२ हजार ३१३ ग्राहकांचा कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांकडे १ हजार १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांना थकबाकीचा भरणा न करताच नवीन वीज पुरवठा दिलेला आहे का, आता याची पाहणी करण्याचे निर्देश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
वीज बिलाची थकबाकी न भरता त्याच अथवा इतर नावाने, नवीन वीजजोडणी दिल्याचे आढळून आल्यास आणि संबंधित ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत. वीज ग्राहकांना वारंवार सूचना, विनंत्या करूनही थकीत वीज बिल न भरल्यास तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते. त्यानंतरही वीज ग्राहकाने थकीत वीज बिलाचा भरणा न केल्यास कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येते.
...अन्यथा कडक कारवाई
थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या ठिकाणी वीज ग्राहकांनी थकबाकीच्या संपूर्ण रकमेचा भरणा करूनच नियमानुसार नवीन वीजजोडणी घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत.
अशी आहे थकबाकी
परिमंडळ ग्राहक थकबाकी (कोटींमध्ये)
औरंगाबाद- ४,१८,९२७ ३९२. ८८
लातूर- ५,४५,१२२ ३६९. ९२
नांदेड- ४,२८,२६४ ३५८. ७६
एकूण- १३,९२,३१३ १,१२१. ५६