जगभरातील सिनेमे आता मराठवाड्यात! ११ व्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 17:37 IST2025-12-13T17:36:12+5:302025-12-13T17:37:53+5:30
मराठवाड्याच्या 'सिनेमा' प्रेमाला जागतिक व्यासपीठ! ११ वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६; प्रेक्षकांना ५ दिवसांची मेजवानी.

जगभरातील सिनेमे आता मराठवाड्यात! ११ व्या अजिंठा-वेरूळ चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर
छत्रपती संभाजीनगर: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणारा बहुप्रतिक्षित अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) च्या तारखांची आयोजकांनी आज (शुक्रवार) घोषणा केली आहे. बुधवार, २८ जानेवारी ते रविवार, ०१ फेब्रुवारी २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंतांच्या मांदियाळीत हा महोत्सव साजरा होणार आहे. हा भव्य महोत्सव रुक्मिणी सभागृह (एमजीएम परिसर) आणि आयनॉक्स थिएटर (प्रोझोन मॉल) येथे आयोजित करण्यात आला आहे.
केवळ महोत्सव नाही, मराठवाड्याचा 'सांस्कृतिक हब'
नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पार पडणार आहे. या आयोजनामागे केवळ चित्रपट दाखवणे हा हेतू नाही, तर छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने 'सांस्कृतिक केंद्र' व 'प्रोडक्शन हब' म्हणून जागतिक पातळीवर पोहोचवणे, हा प्रमुख उद्देश आहे. चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत आणि युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, जेणेकरून त्यांची कला व तांत्रिक जाणीव अधिक सशक्त आणि समृद्ध होईल. तसेच, छत्रपती संभाजीनगर शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण ध्येयही या महोत्सवामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पद्मपाणी पुरस्कारासह कार्यक्रमांची रेलचेल
यावर्षीच्या महोत्सवात सिनेरसिकांसाठी अनेक खास आकर्षणे असणार आहेत:
पुरस्कार: प्रतिष्ठेचा 'पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार' आणि 'सुवर्ण कैलास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार'.
विशेष आयोजन: भारतीय सिनेमा स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन, जागतिक सिनेमा विभाग, रेट्रोस्पेक्टीव्ह आणि ट्रिब्युट.
संवाद: मास्टर क्लास, विशेष व्याख्यान, स्पेशल स्क्रिनिंग आणि परिसंवाद.
या महोत्सवात महाराष्ट्रातील सिनेरसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुकथनकर, चंद्रकांत कुलकर्णी, निमंत्रक नीलेश राऊत आदींनी केले आहे.