१५ दिवसांपूर्वी आईचे निधन, आज टेम्पोच्या धडकेत मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:33 IST2022-09-26T19:32:38+5:302022-09-26T19:33:41+5:30
एका धार्मिक कार्यक्रमासाठी गंगापुरात येताना झाला अपघात

१५ दिवसांपूर्वी आईचे निधन, आज टेम्पोच्या धडकेत मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
गंगापूर : टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने एकजण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गंगापूर शहरातील महाराणा प्रताप चौकात आज सकाळी सात वाजता झाला. शेख मुसा शेख निजाम (३६) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
देवळांना ( ता.खुलताबाद) येथून आज पहाटे शेख मुसा निजाम हा आपला सहकारी वशिम पठान (२२) याच्यासह गंगापूर येथे दुचाकीवरून ( एम.एच.२० ए.सी. ४५४२ ) येत होते. सकाळी सात वाजेच्या दरम्यान ते गंगापूर शहरातील महाराणा प्रताप चौकात वळण घेत असताना वैजापूरहून औंरगाबादकडे जाणाऱ्या टेम्पोने ( एम.एच. १४ ई.एम. ९५७७) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
यात दोघेही दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेख मुसा शेख निजामचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मृत निजामच्या आईचे पंधरा दिवसापूर्वीच निधन झाले असल्याची माहिती आहे. पुढील तपास स.फौ. गणेश काथार हे करीत आहेत.