बसला धडकेल्या मोपेडचा झाला चुराडा; मोपेडवरील दोन मजुरांचा चिरडून जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:33 IST2025-03-04T16:31:25+5:302025-03-04T16:33:43+5:30
मृत दोघे कुंभेफळ येथील रहिवासी आहेत

बसला धडकेल्या मोपेडचा झाला चुराडा; मोपेडवरील दोन मजुरांचा चिरडून जागीच मृत्यू
करमाड : जालना महामार्गावर सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास जालन्याच्या दिशेला जाणाऱ्या बस (एमएच२०जीसी२२०९) ची शेंद्रा एमआयडीसीतील लिभेर चौकात एमआयडीसीतून येणाऱ्या मोपेडसोबत (एमएच२०एफएक्स९१४६) जोरदार धडक झाली. या अपघातात मोपेडवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. गौतम लक्ष्मण साळवे (वय ५०) व साहेबराव हरिभाऊ त्रिगोटे (६०, दोघे रा. कुंबेफळ) अशी मृतांची नावे आहेत.
या अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी व प्रवाशांनी तत्काळ धाव घेतली. मोपेडवरील दोघे बसच्या खाली पाच फुटांपर्यंत आत गेले होते. स्थानिक नागरिकांनी व घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी दोघांना बसच्या खालून बाहेर काढले व शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती सुरळीत करून दिली. गौतम साळवे हे शेंद्रा एमआयडीसीतील हॉटेलमध्ये आचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. साहेबराव त्रिगोटे मजुरी करत होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आहे.