सासरच्या छळाने टोक गाठले; गर्भवती महिलेचा पोटात लाथा मारून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 19:13 IST2025-01-18T19:11:41+5:302025-01-18T19:13:39+5:30
याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे, नसता मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली होती.

सासरच्या छळाने टोक गाठले; गर्भवती महिलेचा पोटात लाथा मारून खून
सिल्लोड : माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून पतीसह सासरच्यांनी गर्भवती महिलेच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना शहरातील शास्त्री कॉलनीत गुरुवारी रात्री ९:३० वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांली पतीसह सासऱ्याला अटक केली.
मनीषा सतीश सपकाळ (वय २४, रा. शास्त्री कॉलनी, सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पती सतीश लक्ष्मण सपकाळ, सासरा लक्ष्मण कडुबा सपकाळ, सासू लिलाबाई सपकाळ यांच्याविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या माहितीनुसार मनीषा हिचे लग्न सतीश याच्यासोबत २०१८ मध्ये झालेले आहे. लग्नानंतर काही महिने सासरच्यांनी मनीषाला चांगले नांदविले. मात्र, त्यानंतर तिचा छळ करण्यास सुरुवात केली. लग्नामधील राहिलेला हुंडा घेऊन ये, तुला मूलबाळ नाही, पतीला नोकरीला लावण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून सासरची मंडळी मनीषाचा शारीरिक व मानसिक छळ करत होती. तिला अनेकवेळा घराबाहेर काढून माहेरी देखील हाकलून दिले होते. माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींची समजूत घातल्यानंतर मनीषा पुन्हा सासरी नांदावयास आली. तरी पण तिचा छळ सुरूच होता. दरम्यान, कुठलीच मागणी मनीषाकडून पूर्ण होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिचा खून करण्याचा कट रचला. मनीषा गर्भवती असल्याचे माहीत असताना, देखील निर्दयी सासरच्यांनी गुरुवारी रात्री ९:३० वाजता तिच्या पोटात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तिचा खून केला.
विवाहितेच्या वडिलाला दिली खोटी माहिती
या घटनेनंतर सासरच्यांनी मनीषाच्या वडिलाला फोन करून तुमच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खाेटी माहिती दिली. त्यानंतर मनीषाचे आई-वडील, नातेवाइकांनी सिल्लोडमध्ये धाव घेतली. परंतु, तोपर्यंत सासऱ्यांनी मनीषाला मृत अवस्थेत सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
आरोपींना अटक करा, नातेवाईक आक्रमक
याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे, नसता मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी मनीषाचे वडील खंडू किसन शेळके (वय ४७, रा. रामपुरवाडी, ता. कन्नड) यांच्या तक्रारीवरून सदर तीन आरोपींविरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती आणि सासऱ्यांनी अटक करण्यात आली. शवविच्छेदन केल्यानंतर मनीषाच्या पार्थिवावर रात्री माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले.