किडनीसाठी पैशांचा व्यवहार? रक्ताचे नाते नसलेल्यांकडून किडनी दान, समिती करते पडताळणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:48 IST2025-03-13T12:48:18+5:302025-03-13T12:48:58+5:30
जागतिक किडनी दिन विशेष: रक्ताचे नाते नसेल आणि किडनी द्यायची असेल तर किडनीदाता आणि किडनी प्राप्तकर्ता यांना या समितीसमोर उपस्थित राहून परवानगी घ्यावी लागते.

किडनीसाठी पैशांचा व्यवहार? रक्ताचे नाते नसलेल्यांकडून किडनी दान, समिती करते पडताळणी
छत्रपती संभाजीनगर : रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला किडनी देण्यासाठी रुग्णालयांस्तरावरच प्रक्रिया होते. मात्र, रक्ताचे नाते नसलेला व्यक्ती किडनी देणार असेल तर मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समितीकडून परवानगी घ्यावी लागते. ही समिती किडनीदानात पैशांचा व्यवहार, दात्यावर कोणताही दबाव नसल्याची पडताळणी करते आणि त्यानंतरच परवानगी देते. समितीने गेल्या वर्षभरात ३२ जणांना किडनीदानाची परवानगी दिली. विशेष म्हणजे एकाचीही परवानगी नाकारली नाही.
दरवर्षी मार्च महिन्यात दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश किडनीच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि किडनीचे आरोग्य राखण्याचे महत्त्व पटवून देणे हा आहे. रक्ताच्या नाते नसलेल्या व्यक्तीला किडनी देण्यासाठी मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समितीची परवानगी घ्यावी लागते. घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत इतर ११ जणांचा समावेश आहे. आई, वडील, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ, पती, पत्नी, आजोबा, आजी यासह रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला किडनी देताना रुग्णालयस्तरावर प्रक्रिया होते. मात्र, रक्ताचे नाते नसेल आणि किडनी द्यायची असेल तर किडनीदाता आणि किडनी प्राप्तकर्ता यांना या समितीसमोर उपस्थित राहून परवानगी घ्यावी लागते. रुग्णांप्रति सहानुभूतीतून पुढाकार घेऊन किडनीदान होत असल्याची खात्री केली जाते.
ऑन पेपर अन् इन कॅमेरा चौकशी
परवानगी घेण्यासाठी ऑन पेपर आणि इन कॅमेरा चौकशी केली जाते. पोलिसांकडूनही पडताळणी केली जाते. बँक स्टेटमेंटची पडताळणी केली जाते. यातून काही आर्थिक देवान-घेवाण झाले आहे का, याची खातरजमा केली जाते.
रक्ताचे नाते नसलेल्या किती जणांना परवानगी?
तारीख- किती जणांना परवानगी?
२१ फेब्रुवारी २०२४- ६
८ मे २०२४ -२
१२ जून २०२४-९
२ ऑगस्ट २०२४-२
४ ऑक्टोबर २०२४- ८
८ जानेवारी २०२५- ३
२७ फेब्रुवारी २०२५-२
सर्व पडताळणीअंतीच परवानगी
सर्व पडताळणी केल्यानंतरच रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीला किडनीदानासाठी परवानगी दिली जाते. किडनी दात्यावर काही दबाव आहे का, पैशांचा व्यवहार झाला आहे का, याची खातरजमा केली जाते. यासंदर्भात पोलिसांकडूनही पडताळणी केली जाते. गेल्या वर्षभरात कुणालाही परवानगी नाकारण्यात आलेली नाही.
- डाॅ. सुरेश हरबडे, अध्यक्ष, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती