लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात विविध प्रकाराचे संघटित गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार विक्की ऊर्फ तान्या नारायण जाधवसह अन्य चौघांवर जालना पोलिसांनी शनिवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित तान्या सध्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.तान्या जाधव हा पोलीस रेकार्डवरील अट्टल गुन्हेगार असून, गत काही वर्षांत त्याने चोरी, दरोडे, लुटमारीच्या उद्देशाने मारहाणीचे गुन्हे केले आहेत. नवीन टोळ्या तयार करून संघटित गुन्हे करण्याच्या पद्धतीमुळे तान्या विरुद्धचे सर्व अभिलेख गोळा करून मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना दिले. तपासात लोहार मोहल्ल्यात राहणाºया १९ वर्षीय तान्या शहरातील गुन्हेगारांची टोळी तयार करून घातक शस्त्रांच्या मदतीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे करतो. या टोळीने मागील सात वर्षांत हिंसाचार करत तीन वर्षांपेक्षा अधिकच्या शिक्षेचे अनेक गुन्हे केले आहेत. सर्वसामान्यांमध्ये त्याची दहशत असल्याने त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास कुणी धजावत नाही. त्यामुळे तान्यासह टोळीतील संशयित सचिन सुभाष जाधव, विशाल शाम पवार व दोन विधि संघर्षग्रस्त मुलांविरुद्ध मोकांतर्गत कारवाईचा अहवाल पोलीस अधीक्षकांमार्फत औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला. पोलीस महानिरीक्षकांनी शनिवारी तान्यासह इतरांवर मोकांतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. त्यानुसार वरील संशयितांवर मोकांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक वारे, घुसिंगे, हरिष राठोड, फुलसिंग घुसिंगे, समाधान तेलंगे्र यांनी ही कारवाई केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी करत आहेत.
अट्टल गुन्हेगार तान्यावर मोक्कांतर्गत गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:46 IST