रास्ता रोको: प्रमुख रस्ते ठरताहेत अपघातास निमंत्रण
- साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद: मोकाट जनावरे शहरातील जालना, जळगाव, बीड बायपास तसेच नगर रस्त्यावर ठाण मांडून बसलेली असतात. लॉकडाऊनपासून ही जनावरे वसाहतीत सतत रास्ता रोको करून असतात. मोकाट कुत्र्यांच्या झुंडी तर वाहनचालकांच्या नाकी दम आणतात. भुंकत पाठलाग करून घाबरून टाकतात. कुत्रे व मोकाट जनावरांचा वाली कोण? नव्याने तयार झालेल्या सिमेंट रस्त्यावर शेणाचे पोहे पडलेले असतात. त्यावरून दुचाकी घसरून हातापायाला इजा होण्याचे प्रकार वाढले आहेत. मनपाच्या पथकाची कुत्रे पकडण्यासाठी धरपकड सुरू असते. परंतु फिरता कोंडवाडा अधूनमधून सातारा बायपास, हर्सुल, मुकुंदवाडी, नारेगाव, चिकलठाणा, हडको परिसरात फिरकत देखील नाही. मोकाट जनावरे कुणाची कुणी सोडली, शोध घेऊन मालकावर गुन्हे का दाखल केले जात नाही. असा सवाल त्रस्त नागरिकांतून व्यक्त होत आहे.
-मोकाट जनावरांचा वाली कोण?
शहरात कोणत्याही परिसरात जा मोकाट जनावरांची टोळी दिसते. फक्त दुभती जनावरेच गोठ्यात बांधली जातात. इतर जनावरांना मोकाट सोडून दिले जाते. चुकून वाहनचालकांना धक्का लागला की, १० लोक जमा होऊन नुकसानभरपाई मागतात. अशा वेळी मनपाने जनावरांच्या मालकावर दंडात्मक कारवाई का करू नये असा संतप्त सवाल अपघातग्रस्त नागरिकांतून उपस्थित होतो आहे.
वर्षभरात एकही कारवाई नाही...
नियम असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोकाट जनावरे पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकणे तसेच रहदारीला अडथळा म्हणून दंडात्मक कारवाई करणे असा नियम असताना कानाडोळा केला जातो.
या मार्गावर वाहने जपून चालवा...
-मुकुंदवाडी जालनारोड, नगर रोडपर्यंत,
-जळगाव रोड ते हर्सुल, रेल्वेस्टेशन ते देवळाई चौक
- मध्यवर्ती बसस्थानक ते दिल्लीगेट
- चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र सिडको वसाहतीचे रस्ते
जनावरे पकडण्यासाठी टीम...
विविध कॉलनी व वसाहतीतून पकडलेल्या कुत्र्यांना वैद्यकीय प्रक्रियेनंतर पुन्हा त्याच्या आदिवासात सोडले जाते. फिरता कोंडवाडा देखील तक्रार आल्यावर जातच असतो. नागरिकांनीच जनावरे रस्त्यावर सोडू नये, अन्यथा कारवाई होईल. - शेख शाहेद (प्रभारी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी मनपा)