परीक्षार्थींच्या वाहनातून चोरले डेबिट-क्रेडिट कार्डसह मोबाइल सीमकार्ड; लाखों रुपयांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:18 IST2025-05-05T13:14:34+5:302025-05-05T13:18:09+5:30

चोरट्यांनी काही वेळातच ऑनलाइन ट्रॅन्झेक्शन करून आणि एटीएममधून रोख रक्कम लाखो रुपये लंपास केले

Mobile SIM cards along with debit-credit cards stolen from examinees' vehicles; Lakhs of rupees taken | परीक्षार्थींच्या वाहनातून चोरले डेबिट-क्रेडिट कार्डसह मोबाइल सीमकार्ड; लाखों रुपयांचा गंडा

परीक्षार्थींच्या वाहनातून चोरले डेबिट-क्रेडिट कार्डसह मोबाइल सीमकार्ड; लाखों रुपयांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : परीक्षार्थींच्या वाहनाची डिक्की उघडून त्यातील दागिने, पैसे, कागदपत्र, मोबाइल सीमकार्ड लंपास केल्यानंतर काही वेळातच ऑनलाइन ट्रॅन्झेक्शन करून लाखो रुपयांना गंडविल्याचा प्रकार सातारा आणि देवगिरी कॉलेज परिसरात घडला.

रमेश दिगंबर व्यवहारे (रा. सिल्लोड) यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी (दि.२) एलएलबीच्या सीईटी परीक्षेसाठी सकाळी ७ वाजता ते दुचाकीने छत्रपती संभाजीनगरला आले. शहरातील श्रेयश कॉलेज येथील पार्किंगमध्ये दुचाकी लावली. जवळील मोबाइल, पॉकेट, पॅनकार्ड, एटीएम, क्रेडिट कार्ड व पोलिस ओळखपत्र डिक्कीत ठेवले. त्यानंतर परीक्षेला गेले. परीक्षा संपल्यानंतर ते बाहेर आले तेव्हा दुचाकीची डिक्की तुटलेली होती.

सागर नामदेव चव्हाण (रा.नागमठाण, ता.वैजापूर) याच्याही दुचाकीच्या डिक्कीतून मोबाइलमधील सिमकार्ड, दोन एटीएम, दोन क्रेडिट कार्ड चोरीस गेले. रोहन नानासाहेब भिसे (रा.सातारा परिसर) यांच्या कारचा दरवाजा उघडून मोबाइलमधील सिमकार्ड, रोख रक्कम, एटीएम, क्रेडिट कार्ड, पॅनकार्ड, सोन्याची चैन चोरीस गेली. चोरट्यांनी या कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढले. त्यात रमेश यांचे ५ हजार ६००, सागर यांचे ६७ हजार आणि रोहन भिसे यांचे ३७,७०० रुपये लंपास झाले आहेत.

दुसऱ्या दिवशी देवगिरीत तोच प्रकार
सातारा परिसरात शुक्रवारी हा प्रकार घडल्यानंतर शनिवारी (दि.३) देवगिरी कॉलेज परिसरातही असाच प्रकार समोर आला. वैशाली अमित फुटाने (रा. पिसादेवी) या एलएलबीची सीईटी देण्यासाठी गेल्या होत्या. त्याची दुचाकी बाहेरच लावली होती. डिक्कीमध्ये मोबाइल, एटीएमकार्ड, क्रेडिट कार्ड, आधारकार्ड ठेवले. परीक्षेहून आल्यानंतर मोबाइल लागत नव्हता. घरी आल्यानंतर पतीला हा प्रकार सांगितला. त्यांनी मोबाइल उघडून पाहिल्यानंतर सिमकार्डच चोरी गेल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ मोबाइलचे दुकान गाठत नवीन सिमकार्ड घेतले. ते चालू केले असता त्यावर पेटीएममधून ७२ हजार रुपये तर बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतल्याचे दिसून आले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. अशाच प्रकारच्या सात ते आठ तक्रारी वेदांतनगर पोलिस ठाण्यात आल्याचेही उघडकीस आले.

 

Web Title: Mobile SIM cards along with debit-credit cards stolen from examinees' vehicles; Lakhs of rupees taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.