'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:45 IST2025-10-25T19:43:22+5:302025-10-25T19:45:46+5:30
तरुणाने लिंकवर क्लिक करताच त्याच्या माेबाईलमध्ये ॲप इंस्टॉल झाले. त्या ॲपने क्षणात त्याच्या मोबाईलचा ताबा घेतला.

'स्वस्तात इंटरनेट मिळेल' लिंकवर क्लिक करताच मोबाईल हॅक; क्षणात १ लाख ३४ हजार गेले
छत्रपती संभाजीनगर : स्वस्तात जिओ फायबर केबल इंटरनेट प्लॅनच्या बनावट लिंकवर क्लिक करताच तरुणाचा संपूर्ण मोबाईल हॅक झाला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्याच्या बँक खात्यातून क्षणात १ लाख ३४ हजार रुपये लंपास केले. सोमवारी याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हनुमाननगरमध्ये राहणारा ३३ वर्षीय तक्रारदार तरुण सध्या पुण्यात खासगी नोकरी करतो. काही दिवसांपूर्वी तो घरी परतला होता. काही महिन्यांपूर्वी त्याला त्याच्या व्हॉट्सॲपवर जिओ फायबर इंटरनेटची लिंक प्राप्त झाली होती. त्यात ३०० रुपये महिन्याप्रमाणे प्लॅन देण्याची जाहिरात होती. त्यावर विश्वास ठेवत तरुणाने लिंकवर क्लिक करताच त्याच्या माेबाईलमध्ये ॲप इंस्टॉल झाले. त्या ॲपने क्षणात त्याच्या मोबाईलचा ताबा घेतला. त्यानंतर मोबाईल आपोआप सायलेंट मोडवर जात बँक खात्यातून १ लाख ३४ हजार रुपये लंपास झाले. विशेष म्हणजे, यात तरुणाने कुठलाही ओटीपी शेअर केला नव्हता. पोलिस निरीक्षक अशोक भंडारे अधिक तपास करत आहेत.