मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने भावाला विहिरीत ढकलले, वर येण्याचा प्रयत्न करताच डोक्यात दगड घातले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 18:55 IST2021-12-09T18:55:22+5:302021-12-09T18:55:49+5:30
पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत ३ डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला.

मोबाईलसाठी अल्पवयीन मुलाने भावाला विहिरीत ढकलले, वर येण्याचा प्रयत्न करताच डोक्यात दगड घातले
औरंगाबादः मोबाईलसाठी अल्पवयीन भावाने नात्यामधील अल्पवयीन भावाचा ढोरकिन-बालनागर परिसरातील एका विहिरीत ढकलून निर्घृण खून केल्याची घटना आज उघडकीस आली. भावाला मोबाइल मिळाला पण त्याने आपल्या भावाचाच त्यासाठी जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडिसी पोलीस ठाणे हद्दीत ३ डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अधिक तपास केला असता या प्रकरणी वाळूज पोलीस स्टेशनला २ डिसेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मयताची ओळख पटवली असता वाळूजजवळ असलेल्या शेंदूरवादा गावातील एका १७ वर्षीय मुलाचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाची कवटी फुटलेली असल्याने पोलिसांनी याचा अधिक खोलात जाऊन तपास केला. यावेळी हा खून मृताच्या मामेभावाने मोबाईलसाठी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी अल्पवयीन मामेभावास ताब्यात घेतले आहे.
कट करून केला खून, मोबाईल भेटला भाऊ गमवला
काही दिवसांपूर्वी आजोबांनी आत्तेभावाला मोबाइल घेऊन दिला होता. पण मामेभावाला हे पसंत नव्हते. मोबाईल मिळविण्यासाठी त्याने आत्तेभावाचा थेट खून करायचं ठरवलं. पार्टी करुयात असे म्हणून आत्तेभावाने त्याला सोबत घेतले. रस्त्यात ढोरकीन जवळ एका विहिरीवर बिर्याणी खाली. नंतर विहिरीवर आपण फोटो काढू असे म्हणत त्याला जवळ नेले. आत्तेभावाला विहिरीच्या काठावर उभे केले आणि काही कळायच्या आत मामेभावाने त्याला विहिरीत ढकललं. विहिरीत पडल्यास त्याने दोर पकडली पण मामेभावाने वरून त्याच्यावर दगड टाकले. यामुळे गंभीर जखमी होऊन तो खाली कोसळून मरण पावला.