मंत्र्यांच्या निर्देशाने ‘नॅक’ मूल्यांकनास मुदतवाढ; प्रवेश रोखलेल्या २३३ महाविद्यालयांमध्ये होणार प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:09 IST2025-05-23T12:09:15+5:302025-05-23T12:09:58+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल २३३ महाविद्यालयांवर कारवाई केली होती.

मंत्र्यांच्या निर्देशाने ‘नॅक’ मूल्यांकनास मुदतवाढ; प्रवेश रोखलेल्या २३३ महाविद्यालयांमध्ये होणार प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ज्या महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन केलेले नाही. त्या महाविद्यालयांमध्ये नवीन प्रवेश थांबविण्याचा निर्णय विद्यापीठांनी घेतला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने तब्बल २३३ महाविद्यालयांवर कारवाई केली होती. मात्र, राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २१ मे रोजी झालेल्या बैठकीत ‘नॅक’ करण्यासाठी महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कारवाई केलेल्या महाविद्यालयांना दिलासा मिळाला आहे. या महाविद्यालयांमध्ये आता प्रवेश होतील.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्यांकन करून घेणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार ‘नॅक’ न केलेल्या महाविद्यालयातील प्रवेश रोखण्याचे आदेशही उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठांनी ‘नॅक’ मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २३३ महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचा निर्णय घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांवर विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कारवाई करण्यात आली होती. विद्यापीठाशी संलग्न ४८४ पैकी केवळ २५१ महाविद्यालयांमध्येच प्रथम वर्षाचे प्रवेश होणार होते. मात्र, उच्च शिक्षण मंत्र्यांच्या आदेशामुळे यावर पाणी फेरले जाणार आहे.
काय दिले निर्देश
राज्याचे उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची २१ मे रोजी बैठक झाली. या बैठकीत नॅक, बंगलोर यांचे मूल्यांकन व पुर्नमूल्यांकनासाठी संस्था नोंदणी पोर्टल कार्यान्वित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितास्तव नॅक मूल्यांकन करण्यास महाविद्यालयांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. त्यानुसार सहा महिन्यांची मुदतवाढ देणारे पत्रच उच्च शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलसचिवांना पाठविले आहे. त्याचा परिणाम राज्यातील विविध विद्यापीठांनी महाविद्यालयांवर कारवाईसाठी उचलेले पाऊल मागे घ्यावे लागणार आहे. त्याचा फायदा टपरीछाप महाविद्यालयांची दुकानदारी कायम राहण्यात होणार आहे.
यांना होणार फायदा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील २३३ कॉलेजांना प्रथम वर्षास प्रवेश देण्यास मनाई केली होती. त्यात छत्रपती संभाजीनगरात जिल्ह्यातील सर्वाधिक ८७ महाविद्यालये, बीड ६४, जालना ५१ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३१ कॉलेजांचा समावेश होता. आता या महाविद्यालयांना फायदा होणार आहे.