अजिंठा घाटात कारला वाचविण्याच्या प्रयत्नात दुधाचा टँकर उलटला, २४ हजार लिटर दूध गेले वाहून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:36 IST2025-07-18T16:34:36+5:302025-07-18T16:36:19+5:30
अजिंठा घाटात समोरून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करीत एक भरधाव कार अचानक ट्रकच्या समोर आली.

अजिंठा घाटात कारला वाचविण्याच्या प्रयत्नात दुधाचा टँकर उलटला, २४ हजार लिटर दूध गेले वाहून
सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, अजिंठा घाटात गुरुवारी (दि. १७) सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास दर्ग्यासमोरील वळणाजवळ अचानक समोरून आलेल्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात एक दुधाचा टँकर उलटला. यातील सुमारे २४ हजार लिटर दूध जंगलात वाहून गेले आहे.
दुधाने भरलेला टँकर (एमएच १७ बीवाय ३३३७) गुरुवारी अहिल्यानगरहून बोदवडकडे निघाला होता. सकाळी ९:०० वाजेदरम्यान अजिंठा घाटात समोरून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करीत एक भरधाव कार अचानक समोर आली. तिला वाचविण्याच्या नादात टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावरच उलटला. यात टँकरचे प्रचंड नुकसान झाले असून, सुमारे २४ हजार लिटर दूध घाटाखालील जंगलात वाहून गेले. यात टँकरचालक सतीश शिंदे (वय ३८, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर घाटात वाहतुकीचा सुमारे तासभर खोळंबा झाला. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजुला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
गोळेगावजवळ भाजीपाल्याचा पिकअप उलटला
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावरील गोळेगावजवळ गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान भाजीपाला भरून भरधाव जाणारे एक पिकअप वाहन उलटले. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. वाहतूक शाखेचे पोउनि. राहुल लोखंडे, थोरात आदींनी क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजुला घेतले.