चिस्तिया कॉलनी, जुना मोंढ्यात मध्यरात्री राडा; एमआयएमच्या माजी नगरसेवकासह ७ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 14:19 IST2022-03-17T14:18:30+5:302022-03-17T14:19:17+5:30
चिस्तिया कॉलनीत नासेर पटेल आणि अज्जू नाईकवाडी यांच्यात मागील काही दिवसांपासून गच्चीवरील अवैध बांधकामावरून वाद सुरू होता.

चिस्तिया कॉलनी, जुना मोंढ्यात मध्यरात्री राडा; एमआयएमच्या माजी नगरसेवकासह ७ जखमी
औरंगाबाद : सिडको एन-६ भागातील चिस्तिया कॉलनी येथे अवैध बांधकामावरून बुधवारी मध्यरात्री दोन गटांत तुफान हाणामारी झाली. एमआयएमचे माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी, त्यांच्या भावासह दोन जण जखमी झाली. विरोधी गटाचे नासेर पटेल आणि अन्य चार जण जखमी झाले, दुसऱ्या घटनेत जुना मोंढा भागात होळीच्या निमित्ताने आयोजित जेवणाच्या कार्यक्रमात मानपानावरून वाद अधिक विकोपाला गेला.
चिस्तिया कॉलनीत नासेर पटेल आणि अज्जू नाईकवाडी यांच्यात मागील काही दिवसांपासून गच्चीवरील अवैध बांधकामावरून वाद सुरू होता. रात्री १२ वाजेच्या सुमारास वाद वाढत गेला. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढविला. विटा, चाकू, दगड, दांड्याने मारहाण करण्यात आली. नाईकवाडी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. नाईकवाडी यांच्या भावाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पटेल यांच्याकडील जखमींना घाटीत दाखल केले.
जुना मोंढ्यात दगडफेक
जुना मोंढा भागातील रोहिदासपुरा येथे भगत यांच्या घरासमोर होळीनिमित्त देवीच्या पूजेचा कार्यक्रम होता. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. त्यामध्ये मानपान देण्याच्या व जुन्या भांडणाच्या कारणावरून चौधरी कुटुंब व भगत कुटुंब यांच्यात वाद होऊन एकमेकांच्या विरोधात दगडफेक झाली. दोन्ही बाजूंचे आठ ते दहा जण जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.