एमआयडीसीच्या रस्त्यांची वाऱ्यावरून वरात; कंत्राटदाराच्या भरवशावरच होणार ५० कोटींचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 14:26 IST2020-12-26T14:24:14+5:302020-12-26T14:26:13+5:30
एमआयडीसीला ‘थर्ड पार्टी इन्सपेक्शन’ लागू केले नसल्यामुळे सगळे काही कंत्राटदाराच्या भरवशावर सुरू असल्याचे दिसले.

एमआयडीसीच्या रस्त्यांची वाऱ्यावरून वरात; कंत्राटदाराच्या भरवशावरच होणार ५० कोटींचा खर्च
औरंगाबाद : शासनाने गुणवत्तापूर्ण रस्ते व्हावेत, यासाठी शहरात मनपा, एमएसआरडीसी आणि एमआयडीसी अशा तीन संस्थांकडे तुकडे करून १५२ कोटी रुपयांची कामे वर्ग केली. मात्र एमआयडीसीकडे असलेल्या सुमारे ५० कोटींच्या रस्त्यांची वाऱ्यावरची वरात सुरू असून सगळा कारभार कंत्राटदाराच्या भरवशावर असल्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा प्रशासक सुनील चव्हाण यांच्या पाहणीअंती समोर आले.
एमजीएमसमोरील रस्ता खालीवर करून ठेवला आहे. चिकलठाणा उद्योगनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे ग्रेडियंट, सरफेस बरोबर नाही. एपीआय कॉर्नर ते कलाग्रामपर्यंत असलेला हा रस्ता पुढे ३६ वरून २७ फूट करण्याचे मार्किंग कंत्राटदाराने केले आहे. वीजेचे खांब हटविण्यासाठी तरतूद केलेली असतांना हा सगळा कारभार फक्त मनपाने पुरविलेल्या माहितीच्या आधारे सुरू असल्याचे सांगून कंत्राटदार व एमआयडीसीच्या अभियंत्यांनी चव्हाण यांच्यासमोर हात वर केले. एपीआय कॉर्नर ते प्रोझोन मॉल रस्त्यावरील ड्रेनेजची पेव्हींग ब्लॉक टाकून उंची वाढविली आहे. ग्रेडियंट, लेव्हलबाबत चुका झाल्या आहेत. एन-१ ते एपीआय कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील सरफेसवर ३ ते ४ मीमीचे तडे पडले आहेत. एमआयडीसीला ‘थर्ड पार्टी इन्सपेक्शन’ लागू केले नसल्यामुळे सगळे काही कंत्राटदाराच्या भरवशावर सुरू असल्याचे दिसले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गणेश कॉलनी, जाधववाडी, घृष्णेश्वर कॉलनी, सिडको बसस्थानक परिसर, एपीआय कॉर्नर, प्रोझोन मॉल ते कलाग्राम रस्ता आणि एमजीएम रुग्णालय परिसरातील रस्त्यांची पाहणी चव्हाण यांनी केली. मनपा, एमआयडीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता चांगली ठेवा
रस्त्यांची कामे करताना चांगली गुणवत्ता ठेवा. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांवर पुरेसे पाणी मारा. रस्त्याची योग्य उंची, सपाटीकरण, सारखेपणा, रस्त्यांच्या बाजूचे पदपथ व्यवस्थित करा, पार्किंग व्यवस्था करा, रिक्षा उभ्या करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्थित जागा ठेऊन दुभाजकांचे सौंदर्यीकरण करा, झाडांना कुंपण घाला आदी सूचना चव्हाण यांनी केल्या.