'मी भिमाला रमाला इथे पाहतो'; 'रमाई पहाट'च्या अभिनव मैफलीत छ. संभाजीनगरवासीय मंत्रमुग्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:21 IST2026-02-07T18:20:38+5:302026-02-07T18:21:54+5:30
असे अभिवादन कधी पाहिले नसेल! 'रमाई पहाट'मध्ये पारंपरिक वाद्ये आणि आधुनिकतेचा संगम

'मी भिमाला रमाला इथे पाहतो'; 'रमाई पहाट'च्या अभिनव मैफलीत छ. संभाजीनगरवासीय मंत्रमुग्ध
छत्रपती संभाजीनगर: शनिवारची सकाळ माता रमाईच्या त्यागाचा सुगंध आणि भीमस्वरांचा झंकार घेऊन आली. निमित्त होते त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे. सिडको कॅनॉट परिसरात शुभ्र वस्त्रात नटलेला जनसागर आणि राज्यभरातून आलेल्या तरुण तडफदार कलावंतांच्या अवििष्काराने 'रमाई पहाट' ही केवळ एक मैफल न राहता, तो एक अनुपम अभिवादन सोहळा ठरला.
सकाळच्या नीरव शांततेत भदंत करुणानंद महाथेरो यांच्या सुश्राव्य बुद्धवंदनेने परिसराला जाग आली. मागील दोन वर्षांपासून कुणाल वराळे, चेतन चोपडे, अजय देहाडे, सचिन भुईगळ, अक्षय जाधव आणि विजय पवार या 'नवरत्नांच्या' पुढाकारातून या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. प्रारंभी या संचाने "मी भिमाला रमाला इथे पाहतो" हे समूहगीत सादर करून उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला.
गायन सत्रात कुणाल वराळे यांनी "अशी रमाई माझी माय" हे आर्त गीत सादर केले. विजय पवार, सचिन भुईगळ (भीमाच्या कोटावर रमा जशी सोनसाखळी) आणि चेतन चोपडे (रमा अशी गुलमोहरी मिळाली) यांनी माता रमाईंच्या स्मृतींना उजाळा दिला. प्रख्यात गायक अजय देहाडे यांनी "नऊ कोटीची माता" आणि "जा जगाला सांग, बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर" ही गीते सादर करताच हजारो उपस्थितांनी ठेका धरला.
हलगीची आणि संबळची जुगलबंदी रंगली
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते अहिल्यानगर येथील अविनाश शिंदे आणि संच यांचे संबळ वादन. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारात संबळ वाजविणाऱ्या कलावंतांची ही १७ वी पिढी असून, त्यांच्या पारंपरिक पोषाखातील सादरीकरणाने अंगावर शहारे आणले. याच वेळी कन्नडच्या लिंभोरा येथील ओमसाई ग्रुपच्या हलगीची आणि संबळची अतितटीची जुगलबंदी रंगली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
स्त्रीशक्तीचा जागर
स्त्रीशक्तीचा बहारदार आविष्कार या सोहळ्यात पाहायला मिळाला. वैष्णवी गीते आणि सानिका कुलकर्णी या तरुणींनी ढोलकीवर तोडा आणि छकडी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कोमल बोर्डे यांचा सॅक्सोफोन, समृद्धी भालेराव व अनुष्का डोंगरे यांचे व्हायोलिन वादन 'रमाई पहाट'चा दर्जा उंचावून गेले. अमरावतीहून आलेल्या पल्लवी व प्रवीण खाडे या बालकलावंतांच्या बेंजो वादनाने अंतरमनाचा ठाव घेतला. सोबतच एका पाच वर्षीय ढोलकीपटूनेही सर्वांचे लक्ष वेधले.
रॅपने तरुणाईची मने जिंकली
आधुनिक रॅप संगीतातून प्रबोधन करताना मुंबईचा रॅपर गोपू याने 'मासिक पाळी' सारख्या विषयावर रॅप सादर करून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले. तर शहराची रॅपर व्हीआयपी श्रावस्ती हिने रमाईंवरील रॅप सादर करून तरुणाईची मने जिंकली.
प्रबोधन आणि चित्तथरारक मल्लखांब कवायतीने
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालभवनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रमाई नाटकाने सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. रमाई महिला मंडळाच्या मुलींनी लेझीम नृत्यातून लक्ष वेधले. वैचारिक प्रबोधन करताना कवी नारायण पुरी यांच्या 'जांगडगुत्त्याने' प्रेक्षक हसून लोटपोट झाले तर कवी अविनाश भारती यांची "गावकुसाबाहेर" ही कविता आत्मचिंतन करायला भाग पाडणारी ठरली. कार्यक्रमाची सांगता टायगर ग्रुपच्या दोरीवरील चित्तथरारक मल्लखांब कवायतीने झाली. सद्दाम शेख यांनी आपल्या दिलखेचक निवेदन केले. सूर्य माथ्यावर येईपर्यंत चाललेला हा सोहळा शिस्तबद्धता आणि स्वच्छतेचा नवा आदर्श घालून देऊन गेला.