शेतात नववर्षाच्या पार्टीसाठी मांस घेतलं, वासाने आला बिबट्या, हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 13:31 IST2023-01-02T13:30:02+5:302023-01-02T13:31:33+5:30
मित्रांनी नववर्षानिमित्त शेतात मांसहारी पार्टी करण्याचा बेत आखला होता

शेतात नववर्षाच्या पार्टीसाठी मांस घेतलं, वासाने आला बिबट्या, हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
सिल्लोड (औरंगाबाद) : तालुक्यातील रेलगाव येथील मानकाई देवी डोंगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून नरडीचा घोट घेतला. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. रवी अंबादास काजले(वय २८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी रवी काजले व त्यांच्या मित्रांनी नववर्षानिमित्त शेतात मटणाची पार्टी करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार रवी काजले हे बोकडाचे मटण घेऊन रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून एकटे निघाले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात खाली पडलेल्या रवी काजले यांचा गळा बिबट्याने जबड्यात धरून त्यांच्या नरडीचा घोट घेतला. पाठीमागून रवी यांचे मित्र आल्यानंतर त्यांना रवी यांची मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला पडलेली दिसली.
त्यांनी थांबून पाहणी केली असता, रवी काजले हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ ही बाब गावांत व पोलिसांना कळविली. या घटनेमुळे गावात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते.
बिबट्याच्या हल्ल्याचा प्राथमिक अंदाज
सदर इसमावर बिबट्याने हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज आहे; मात्र खरंच बिबट्या होता की इतर हिंस्त्र प्राणी, याचा शोध वनविभाग घेत आहे. मयत इसमाला सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.
- सीताराम मेहेत्रे, पोलिस निरीक्षक, सिल्लोड ग्रामीण