हॉटेलमध्ये जेवण पडले महागात; दीड तासात चोरट्यांनी घर फोडून दागिने पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 19:28 IST2022-12-16T19:28:02+5:302022-12-16T19:28:15+5:30
राजपूत कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना कुलूप तुटलेले दिसून आले.

हॉटेलमध्ये जेवण पडले महागात; दीड तासात चोरट्यांनी घर फोडून दागिने पळवले
औरंगाबाद : हॉटेलात जेवायला जाणे एका कुटुंबास चांगलेच महागात पडले. अवघ्या दीड तासात चोरट्याने घर फोडून घरातील ६७ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना नक्षत्रवाडीत बुधवारी सायंकाळी ७.३० ते ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणसिंग राजपूत (रा. हिंदुस्तान आवास, पैठण रोड) हे कुटुंबीयांसह सायंकाळी हॉटेलात जेवायला गेले. ही संधी साधून चोराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या दोन तोळ्याच्या चार अंगठ्या, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, ३ ग्रॅमचे दोन टॉप्स आणि एक ग्रॅमच्या चार बांगड्या असा ६७ हजारांचा ऐवज लंपास केला. राजपूत कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना कुलूप तुटलेले दिसून आले. आत पाहिले असता चोरी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ सातारा पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास उपनिरीक्षक संभाजी गोरे करीत आहेत.