एमडी ड्रग्ज, गावठी कट्टा आणि कवट्यांची माळ...आरोपीकडे सापडलेल्या वस्तूंनी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 15:15 IST2025-09-08T15:12:24+5:302025-09-08T15:15:01+5:30
एकाच आरोपीकडे अंमली पदार्थ, शस्त्र आणि जादूटोण्याचे साहित्य सापडल्याने पोलीसही चक्रावले.

एमडी ड्रग्ज, गावठी कट्टा आणि कवट्यांची माळ...आरोपीकडे सापडलेल्या वस्तूंनी खळबळ
छत्रपती संभाजीनगर : अमली पदार्थ, गावठी कट्टा बाळगण्यासह काळी जादू करण्याचे साहित्य अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने (एनडीपीएस) रविवारी दुपारी टाकलेल्या छाप्यात पकडले. वेगवेगळ्या प्रकारच्या ३४ वस्तू पथकाने जप्त केल्या असून, एका आरोपीला ताब्यात घेतले. जिन्सी पोलिस ठाण्यात मध्यरात्री अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा, एनडीपीएस आणि अवैध हत्यार बाळगण्याच्या कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
शेख नियाज शेख नजीर ऊर्फ सिकंदर (३५, रा. मुजीब काॅलनी, गल्ली नं. २, कटकट गेट ), असे आरोपीचे नाव आहे. एनडीपीएस पथकाच्या प्रमुख पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना आरोपी सिकंदर याने अमली पदार्थ विक्रीस आणले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार संदीप धर्मे, महेश उगले, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, छाया लांडगे यांच्यासह फॉरेन्सिक तज्ज्ञ प्रीती क्षीरसागर, महेश बळी, प्रसाद देशमुख यांनी छापा मारला. घरझडती घेतल्यानंतर दोन पिशव्यांमध्ये १२ ग्रॅमपेक्षा अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याशिवाय एका कपाटातील पिशवीमध्ये रिकामी मॅक्झिन असलेला गावठी कट्टा सापडला, तसेच २० ग्रॅमपेक्षा अधिक वजनाची संशयित पावडर आढळली. नंतर काळी जादू करण्यासाठीचे साहित्य असलेली जनावरांची दोन हाडे, एक कासवाचे वरचे आवरण असलेले हाड, एक काळ्या कापडी भुताचा मुखवटा, चामडी हंटर, बारीक कवड्या, १०९ कवट्यांची माळ, मध्यम कवटीच्या ५५ कवट्या असलेली माळ आणि ३३ मोठ्या कवट्यांची एक माळही सापडली. लाल रंगाच्या कापडामध्ये चंदेरी रंगाच्या धातूची ८४ आणि सोनेरी रंगाची ७९ नाणी सापडली. धातूचे कासव, काळ्या रंगाचे दगडगोटे, कुंकू, हळद, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले.
आरोपीच्या विरोधात दंगलीचा गुन्हा
एनडीपीएसच्या पथकाने छापा मारून पकडलेल्या आरोपीच्या विरोधात २०१७ मध्ये राजाबाजार परिसरात झालेल्या दंगलीचाही गुन्हा नोंद असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली, तसेच या आरोपीचे धागेदोरे अमली पदार्थाच्या विक्रीबाबत परराज्यापर्यंत असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.