गर्लफ्रेंडच्या फ्लॅटसाठी चीनवरून साहित्य; २१ कोटींचा घोटाळा, क्लर्ककडे ५ फ्लॅट, BMW कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:29 IST2024-12-25T14:27:42+5:302024-12-25T14:29:32+5:30
मागेल त्या रकमेत फ्लॅट्सची खरेदी, पोलिसांच्या पाहणीत आणखी तीन फ्लॅट उघड; गुन्हा दाखल झाल्यानंतरही फ्लॅटच्या इंटेरिअरचे काम सुरू

गर्लफ्रेंडच्या फ्लॅटसाठी चीनवरून साहित्य; २१ कोटींचा घोटाळा, क्लर्ककडे ५ फ्लॅट, BMW कार
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलाच्या निधीतून २१ कोटी ५९ लाख लंपास करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागर याने एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच फ्लॅट खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी विमानतळ परिसरात प्रेयसीच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटच्या सजावटीसाठी त्याने चीनहून महागड्या वस्तूदेखील मागवल्या. फ्लॅटमध्ये बदल करण्यासाठी खरेदी केलेले जवळपास २० लाख रुपयांचे साहित्यदेखील आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी क्रीडा विभागाच्या विभागीय क्रीडा संकुलात हा अजब घोटाळा उघडकीस आला. अवघा तेरा हजार रुपये पगार व पदवीपर्यंत शिक्षण असलेला हर्षकुमार कंत्राटी पद्धतीवर लिपिक म्हणून जानेवारी २०२३ मध्ये या विभागात नोकरीस लागला होता. उपसंचालकांच्या लेटरहेडच्या मदतीने बँकेला दिलेल्या अधिकृत ई-मेल आयडीमध्ये बदल करत त्याने विभागाला येणारा निधीच स्वतःच्या विविध खात्यांवर वळता करून अकरा महिन्यांत कोट्यवधींचा घोटाळा केला. यात त्याचे भागीदार असलेले यशोदा शेट्टी व तिचा पती जीवन कार्यप्पा विंदडा यांची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.
आणखी दोन लिपिकांचे जबाब
तपास पथकाने मंगळवारी क्रीडा विभागात हर्षकुमारसोबत काम करणाऱ्या दोन कंत्राटी लिपिकांची तीन तास चौकशी करून जबाब नोंदवले. विभागातील अन्य अधिकाऱ्यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पथकाने हर्षकुमारच्या नावाने किती बँकांमध्ये खाती आहेत, याची माहिती मागवली आहे.
इंटेरिअरसाठी चीनहून वीस लाखांचे साहित्य
हर्षकुमारने विमानतळ परिसरातील एका इमारतीत एका शासकीय अधिकाऱ्याचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यासाठी त्याने दोन लाख रुपये ॲडव्हान्सही दिला. त्याच इमारतीत प्रेयसीच्या नावाने सहा खोल्यांचा दोन कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला. त्याचे नुकतेच नूतनीकरण सुरू केले. आर्किटेक्टला त्याने पूर्ण फ्लॅट बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. महागड्या उच्च दर्जाच्या फरशादेखील खरेदी केल्या. चीनहून सजावटीचे साहित्य मागवले. अंबड तालुक्यातील असलेला हर्षकुमार विंदडाच्या नावावर घेतलेली कार घेऊन पसार झाला आहे. त्याची प्रेयसीदेखील गायब आहे.