२ लाख रुपये देऊन लग्न केले, मात्र, तासाभरातच गाडीवर हल्ला; वधूचे रोकडसह पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 13:15 IST2025-08-07T13:09:57+5:302025-08-07T13:15:01+5:30
साताऱ्यातील तरुणाची फसवणूक; वाहनावर हल्ला करून गुंडांची पळण्यास मदत

२ लाख रुपये देऊन लग्न केले, मात्र, तासाभरातच गाडीवर हल्ला; वधूचे रोकडसह पलायन
छत्रपती संभाजीनगर : एजंटमार्फत लग्नासाठी १ लाख ८० हजारांत मुलगी देण्याचे आमिष दाखवून खोटे लग्न लावले. पैशांची देवाण- घेवाणही झाली. मुलाकडचे नववधूला घरी घेऊन जात असतानाच अज्ञात टोळीने त्यांच्या वाहनावर हल्ला चढवत मुलीला घेऊन पळ काढला. मंगळवारी रात्री उशिरा या घटनेप्रकरणी एजंट नंदकुमार चव्हाण (रा. कोरेगाव, ता. सातारा), वधू बनण्याचे नाटक केलेली दिशा माधव कदम व माेनिका यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील आर्वी गावातील ३९ वर्षीय महेश यादव या शेतकऱ्याचे लग्न ठरत नव्हते. २५ जुलै रोजी त्यांच्याच तालुक्यातील चव्हाणने त्यांच्या घरी जात छत्रपती संभाजीनगरचे एक स्थळ असल्याचे सांगितले. दिशाचे छायाचित्र दाखवल्यानंतर कुटुंबाने लग्नास होकार दिला. तेव्हा मोनिका नामक महिलेने संपर्क साधून लग्नासाठी १ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली. त्यासही यादव कुटुंब तयार झाले. २९ जुलै राेजी महेश कुटुंबासह शहरात आले. मोनिकाने त्यांना दिशाच्या आंबेडकरनगरमधील घरी नेऊन चहा पाजला.
कपड्यांची खरेदी, न्यायालयासमोर लग्न
सायंकाळी सर्वांनी साड्या व अन्य कपड्यांची टिळक पथ येथून खरेदी केली. आरोपींनी त्यांना कौटुंबिक न्यायालयासमोर नेत येथेच कोर्ट मॅरेज केले जाते, असे सांगत एका वकिलाकडे नेले. तेथे नोटरी बनवून लग्न झाल्याचे घोषित केले. तेव्हा महेश यांनी माेनिकाला १ लाख रोख, तर उर्वरित ८० हजार रुपये ऑनलाइन पाठवले.
गुंडांनी हल्ला करीत नेले पळवून
लग्न झाल्याच्या आनंदात महेश आनंदाने साताऱ्याच्या दिशेने निघाले. तेव्हा त्यांच्याकडे लग्न झाल्याची कागदपत्रे, ३५ हजार रोख, कपड्यांची बॅग होती. रात्री ०८.३० वाजता त्यांची कार वाळूज परिसरात जाताच अचानक त्यांना रस्त्यात अडवण्यात आले. चारचाकीतून उतरलेल्या गुंंडांनी काचा फोडत चालकाला मारहाण केली. तेवढ्यात महेशकडील पैसे घेऊन दिशा व तिच्या बहिणीने धूम ठोकली. यात मोठे रॅकेटच असण्याचा संशय आहे. सर्व आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असून, लवकरच अटक केली जाईल, असे सहायक फौजदार सुभाष शेवाळे यांनी सांगितले.