छ. संभाजीनगर मनपाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत हर्सूल गावात मार्किंग; १५० मालमत्ता बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:37 IST2025-07-16T19:36:58+5:302025-07-16T19:37:42+5:30
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत मंगळवारी हर्सूल गावात मार्किंग केली. महापालिकेच्या नगररचना विभागाचे पथक मार्किंगसाठी जाताच गावातील ...

छ. संभाजीनगर मनपाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत हर्सूल गावात मार्किंग; १५० मालमत्ता बाधित
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने रस्ता रुंदीकरण मोहिमेंतर्गत मंगळवारी हर्सूल गावात मार्किंग केली. महापालिकेच्या नगररचना विभागाचे पथक मार्किंगसाठी जाताच गावातील मालमत्ताधारकांनी सुरुवातीला विरोध दर्शविला. त्यानंतर मार्किंग करण्यास मुभा देण्यात आली. १५० मालमत्ता मार्किंगमध्ये बाधित होत आहेत.
हर्सूल गावात १३ फेब्रुवारी २०२३ रोजी नॅशनल हायवेच्या आग्रहावरून महापालिकेने १०० फूट रस्त्यासाठी तब्बल ९८ मोठमोठ्या मालमत्ता जमीनदोस्त केल्या होत्या. १९९१ आणि २०२५ च्या विकास आराखड्यानुसार रस्ता २०० फूट रुंद आहे. त्यामुळे उर्वरित १०० फूट रस्ता रुंद करण्यासाठी मनपाने शनिवार, दि. १२ जुलै रोजी मालमत्ताधारकांना पूर्वसूचना देणारा भोंगा फिरवला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांनी प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेतली होती. या भेटीत कोणताही दिलासा गावकऱ्यांना मिळाला नव्हता. दरम्यान, मंगळवारी सकाळीच मनपाच्या नगररचना विभागाचे अधिकारी, कर्मचारी हर्सूल गावात दाखल झाले. रस्त्याचा केंद्रबिंदू ठरवून दोन्ही बाजूने ३० मीटर मोजणी केली. केंद्रबिंदूपासूनचे अंतर कमी-जास्त होत असल्याचा मालमत्ताधारकांचा आक्षेप होता. पथकातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे समाधन करीत, त्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत मार्किंगचे काम पूर्ण केले.
हर्सूल टी पॉइंट ते हर्सूल पाझर तलावापर्यंत मार्किंग करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मार्किंगमध्ये आलेल्या व्यावसायिक मालमत्तांवर लगेचच कारवाई केली जाऊ शकते, निवासी मालमत्तांना मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार १५ ऑगस्टपर्यंतची मुदत आहे.
कोणत्या मालमत्ता बाधित?
रहिवासी वापर : ६५
वाणिज्य वापर : ४५
मिश्र वापर : ४०
एकूण : १५०