जैतखेडा शिवारात तुरीच्या आडून गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 16:45 IST2025-10-18T16:41:39+5:302025-10-18T16:45:02+5:30
जैतखेडा शिवारातील तुरीच्या शेतात वेताळ याने गांजासदृश झाडांची लागवड केल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली.

जैतखेडा शिवारात तुरीच्या आडून गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात
पिशोर : कन्नड तालुक्यातील जैतखेडा शिवारात एका महाभागाने तूर पिकाच्या आड गांजाची शेती पिकवली. ही बाब माहीत झाल्यानंतर पिशोर पोलिसांनी गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतात छापा मारून १५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी शुक्रवारी काकासाहेब नानासाहेब वेताळ (वय ६०) याच्याविरुद्ध पिशोर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिशोर ठाणे हद्दीतील जैतखेडा शिवारातील गट क्र. २१५ मधील तुरीच्या शेतात छापा टाकून १५ लाख रुपये किमतीचा दीडशे किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. जैतखेडा शिवारातील तुरीच्या शेतात वेताळ याने गांजासदृश झाडांची लागवड केल्याची माहिती पिशोर पोलिसांना मिळाली. सपोनि शिवाजी नागवे, उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, जमादार विलास सोनवणे, वसंत पाटील, लालचंद नागलोत, पोकॉ. अन्सार पटेल, कौतिक सपकाळ, पवन खंबाट, गृहरक्षक दलाचे जवान नितीन शिंदे यांनी महसूल विभाग तसेच फॉरेन्सिक लॅबच्या कर्मचाऱ्यांसह गट क्र. २१५ मध्ये छापा टाकला. त्यांना उग्र वासाच्या हिरवट, भुरकट रंगाची पाने व बारीक बोंड असलेली असंख्य झाडे दिसून आली.
पथकाने संपूर्ण झाडे उपटून पंचनामा केला असता १५० किलो गांजा असल्याचे मिळून आले. सदरील गांजाची बाजारातील किंमत ही पंधरा लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेकायदेशीररीत्या गांजा झाडांची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याप्रकरणी काकासाहेब वेताळ याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. शुक्रवारी कन्नड न्यायालयात वेताळ यांना हजर करण्यात आले असता त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. सपोनि शिवाजी नागावे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, जमादार वसंत पाटील अधिक तपास करीत आहेत.