पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक जाधव यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
By सुमित डोळे | Updated: September 16, 2024 19:56 IST2024-09-16T19:55:37+5:302024-09-16T19:56:12+5:30
क्रांतीनगरमध्ये राहणारे अशोक गोविंद जाधव गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते.

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष अशोक जाधव यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीला अडकवलेली भाज्यांची पिशवी रस्त्यावर पडल्याने उचलण्यासाठी थांबलेल्या अशोक गोविंद जाधव (५५) यांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात आज, सोमवारी दुपारी खुलताबाद रस्त्यावर झाला. अशोक गोविंद जाधव हे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष होते. रात्री उशिरा त्यांच्या पार्थीवावर रमानगर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
क्रांतीनगरमध्ये राहणारे अशोक गोविंद जाधव गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते. ते पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे मराठवाडा कार्याध्यक्ष होते. आज, सोमवारी कामानिमित्त ते खुलताबादला गेले होते. तेथे भाजीपाला खरेदी करुन दुचाकीने पुन्हा घराकडे निघाले होते. खुलताबादच्या जवळ रस्त्यावर एका ठिकाणी त्यांची भाजीची पिशवी निसटून खाली पडली. ती घेण्यासाठी रस्त्यात थांबले असता पाठी मागून आलेल्या सुसाट ट्रकचालकाने त्यांना धडक देऊन पोबारा केला. स्थानिकांनी धाव घेत कदम यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. अशाेक कदम यांच्या अपघाती मृत्यूने शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.