पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवर तर शिक्षक संघाचे विश्वासराव दुसऱ्या स्थानी
By विकास राऊत | Updated: February 2, 2023 13:51 IST2023-02-02T13:36:02+5:302023-02-02T13:51:20+5:30
यावेळी १४ तर २०१७ साली २० उमेदवार निवडणूक मैदानात होते. प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिक्षक संघाच्या उमेदवारांत झाली आहे.

पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवर तर शिक्षक संघाचे विश्वासराव दुसऱ्या स्थानी
औरंगाबाद:शिक्षक मतदारसंघात १४ उमेदवारांमुळे बहुरंगी लढत झाली. आज मतमोजणीच्या दिवशी राष्ट्रवादी, मराठवाडाशिक्षक संघ आणि भाजपयांच्यात तगडी फाईट होईल असे चित्र दिसत आहे. यावेळी १४ तर २०१७ साली २० उमेदवार निवडणूक मैदानात होते. प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, शिक्षक संघाच्या उमेदवारांत झाली आहे.
पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे विक्रम काळे १८ हजार मते घेऊन आघाडीवर आहेत. मराठवाडा शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव-१३२६८ हे दुसऱ्या तर भाजपचे किरण पाटील - १३२४७ मते घेऊन तिसऱ्या स्थानी आहेत. दरम्यान २ हजार मते अवैध झाली.
अशी सुरु आहे मतमोजणी.....
५६ टेबलवर मतमोजणी सुरु आहे. यासाठी ७०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरुवातीला सर्व मतपेटीतील मते एका हौदात टाकण्यात येतील. त्यानंतर, सर्व मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. यातून २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा, याप्रमाणे ४० गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मतांप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल. त्यानंतर मतांच्या फेऱ्या सुरू होतील. या सगळ्या प्रक्रियेला पूर्ण दिवस लागू शकतो, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी वर्तविली.
उमेदवारांमध्ये धाकधूक.....
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह मराठवाडा शिक्षक संघ व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतमोजणीपूर्वी सर्वांची धाकधूक वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ.विक्रम काळे, भाजपकडून प्रा.किरण पाटील, वं.ब.आघाडीकडून कालिदास माने, तर मराठवाडा शिक्षक संघाकडून सूर्यकांत विश्वासराव, अपक्ष प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, संजय तायडे, कादरी शाहेद अब्दुल गफूर, अनिकेत वाघचवरे, नितीन कुलकर्णी, विशाल नांदरकर, प्रा.अश्विनकुमार क्षीरसागर, आशिष देशमुख, ज्ञानोबा डुकरे यांनी निवडणूक लढविली.