मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेने गाठला ९१ टक्क्यांचा पल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 18:44 IST2020-01-31T18:35:56+5:302020-01-31T18:44:22+5:30
आता ३१ मार्चपर्यंत डेडलाईन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेने गाठला ९१ टक्क्यांचा पल्ला
औरंगाबाद : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी निवडलेल्या १५६९ गावांमध्ये जानेवारी २०२० अखेरपर्यंत ९१ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे. कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबरअखेरची डेडलाईन होती. आता ३१ मार्चपर्यंत डेडलाईन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.
या वर्षामध्ये २२ हजार ४१५ कामांपैकी आतापर्यंत २० हजार ३२४ कामे पूर्ण झाली असून, २ हजार ९१ कामे अपूर्ण आहेत. आतापर्यंत हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत, तर लातूर जिल्ह्यात सर्वात कमी कामे झाली आहेत.
५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार या योजनेचा अंमलबजावणी कालावधी डिसेंबर २०१९ पर्यंतचा होता. २०१८-१९ पर्यंत निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण करण्यास डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता मार्च २०२० पर्यंत या कामांना मुदतवाढ मिळण्याचा अंदाज आहे. विभागात ९१.१४ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा अहवालानुसार प्रशासन करीत आहे.