मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, बारा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:46 IST2025-09-04T13:33:41+5:302025-09-04T13:46:08+5:30
मराठवाड्यातील ३ हजार ९२९ गावांतील १५ लाख ७८ हजार ३३ शेतकरी बाधित झाले आहेत

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, बारा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आतापर्यंत ५ लाख ६२ हजार ७२७ हेक्टरवरील नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या तीन महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ५० व्यक्तींचा मृत्यू झाला तर लहान-मोठी मिळून १ हजार ४९ जनावरे दगावली आहेत. मराठवाड्यातील ३ हजार ९२९ गावांतील १५ लाख ७८ हजार ३३ शेतकरी बाधित झाले असून, एकूण १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
यात नांदेड जिल्ह्यात ५ लाख १४ हजार १५६ हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार ६०८ हेक्टरवरील, परभणी जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ४६७ हेक्टरवरील, बीड जिल्ह्यातील ३३ हजार ३२२ हेक्टरवरील तर लातूर जिल्ह्यातील २ लाख ७४ हजार ८७७ हेक्टरवरील, धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार १११ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील १७ हजार हेक्टर तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अडीचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नेमके किती क्षेत्र बाधित झाले, हे समजेल.