छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. जून महिन्याचा अनुभव यंदा मे महिन्यातच येत आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका विभागातील सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसला. यात सर्वाधिक म्हणजे २ हजार हेक्टर बाधित क्षेत्र जालना जिल्ह्यात असून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ३ हजार २६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मे महिन्यांच्या पहिल्या पंधरवड्यातही ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
पावसामुळे तापमान कमी झाले. छत्रपती संभाजीनगरसह विभागात सरासरी ३४ अंश सेल्सिअस कमाल, तर २४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. १६ मे सकाळपर्यंत मराठवाड्यात १२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर १ ते १६ मेपर्यंत १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १४ मि.मी. जालना १०, बीड १५, लातूर १०, धाराशिव २५, नांदेड ११, परभणी १४, हिंगोली जिल्ह्यात ११ मि.मी. पावसाची नोंद झाली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला.
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव येथे दुपारी वादळी पावसासह वीज पडून गोरख ब्राह्मणे यांच्या मालकीच्या गायीचा मृत्यू झाला. गंगापूर तालुक्यातील बोरगाव येथील पोपट तांबे यांचे दोन बैल वीज पडून मृत झाले. खुलताबाद तालुक्यातील लोणी येथील रज्जाक पटेल यांची गाय मृत झाली. गंगापूर तालुक्यातील शिरजगाव येथील भावसिंग चापुले यांच्या मालकीचा बैल वीज पडून दगावला. सिल्लोड तालुक्यातील गेवराई सेमी येथील उत्तम ताठे यांच्या मालकीचा एक बैल दगावला, एक जखमी झाला. खुलताबाद येथील निर्गुडी तालुक्यातील प्रभाकर अंभोरे यांच्या घराची भिंत पडली.
१६ दिवसांत सहा जणांचा मृत्यू१ मे ते आजवर वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात छत्रपती संभाजीनगर व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी दोन घटना, बीड जिल्ह्यात तीन, तर लातूर जिल्ह्यात एक घटना घडली. तर आतापर्यंत २० जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.