‘हेल्थ केअर’मधून मराठवाडा वगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:20 IST2017-10-04T01:20:43+5:302017-10-04T01:20:43+5:30
राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा हेल्थ केअर मॉडेल जिल्हा मोहिमेत समावेश शासनाने केला असून, त्यामध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही.

‘हेल्थ केअर’मधून मराठवाडा वगळला
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा हेल्थ केअर मॉडेल जिल्हा मोहिमेत समावेश शासनाने केला असून, त्यामध्ये मराठवाड्यातील एकही जिल्हा नाही. मराठवाड्यातील एखाद्या जिल्ह्याचा जर समावेश झाला असता, तर मागासलेल्या या विभागाच्या जखमेवर फुंकर मारल्यासारखे झाले असते.
मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि औरंगाबाद यापैकी एकही जिल्हा शासनाला मॉडेलमध्ये घ्यावासा का वाटला नाही. याबाबत मराठवाडा विकास मंडळ सदस्यांनी वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना खरमरीत पत्र दिले आहे.
मुळातच ‘मराठवाड्याचे आरोग्य’ हा विषय शासनाच्या लेखी दुर्लक्षित राहिलेला आहे. आरोग्याच्या सर्वच इंडिकेटरमध्ये मराठवाडा मागे आहे. प्राथमिक आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी एकाच डॉक्टरच्या खांद्यावर आहे. ३० ते ४० टक्के जागा रिक्त आहेत. पायाभूत सुविधांची वाईट अवस्था आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. किडनी, हृदय, लिव्हर आदी आजारांवरील उपचारांसाठी पुणे, मुंबई, हैदराबाद येथे रुग्णांना जावे लागते. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मराठवाड्यात असणे गरजेचे आहे. मानसोपचारासाठी येरवडा, ठाणे, नागपूरला येथील रुग्ण भरती करावे लागतात. अशी परिस्थिती असताना शासनाने मराठवाड्यातील आरोग्य विकासाला वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.