पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत मराठावाडा आरोग्यात २५ वर्षे मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 19:36 IST2019-11-26T19:35:19+5:302019-11-26T19:36:46+5:30

जीवनदायीसारख्या योजनेत सर्वसामान्य आजारांचा समावेश झाला पाहिजे. पायाभूत सुविधांबरोबर ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले पाहिजेत. तशी अटच निर्माण केली पाहिजे. ग्रामीण रुग्णालयांतील सुविधा वाढल्या पाहिजेत. 

Marathwada 25 years behind in health than West Maharashtra, Vidarbha | पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत मराठावाडा आरोग्यात २५ वर्षे मागे

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत मराठावाडा आरोग्यात २५ वर्षे मागे

- संतोष हिरेमठ 
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवटसारख्या आदिवासी भागात गेल्या २५ वर्षांपासून ‘साने गुरुजी रुग्णालया’च्या माध्यमातून डॉ. अशोक बेलखोडे यांचा आरोग्यसेवेचा यज्ञ सुरू आहे. या रुग्णालयाद्वारे सर्वसामान्य आणि गोरगरिबांना ते सेवा देत आहेत. मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य व आरोग्य विषय विशेष समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. मराठवाड्यात वर्षानुवर्षे आरोग्य प्रश्न ‘जैसे थे’ राहत आहेत. हे प्रश्न सुटावेत यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करीत आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेत मराठवाडा आरोग्य सुविधांमध्ये तब्बल २५ वर्षे मागे असल्याचे ते सांगतात. डॉ. अशोक बेलखोडे यांनी ‘लोकमत’शी साधलेला हा संवाद... 

प्रश्न : ‘साने गुरुजी रुग्णालया’ची सुरुवात कशी झाली?
उत्तर : २५ वर्षांपूर्वी किनवट येथे हे रुग्णालय सुरू केले. त्याकाळी येथील मी पहिला सर्जन होतो. सध्या २५ खाटांची सुविधा आहे. सध्या येथे मोठ्या शस्त्रक्रिया होतात. अडलेले बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, कर्करोगाचीही शस्त्रक्रिया होते. पूर्वी गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी यवतमाळ, नांदेडला जावे लागत होते. आता ते बंद झाले आहे. ३९२ गावांतील ३ लाख लोक रुग्णालयात येतात. येथील आदिवासी भागातील लोक रुग्णालयाला आता ‘जीवनदायी केंद्र’ म्हणतात.

प्रश्न : मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची संकल्पना कशी ?
उत्तर : दिवसेंदिवस नवनवीन वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत होत आहे. मात्र, आदिवासी भागात काहीच नाही.  त्यामुळेच किनवट येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय काढण्याचे ठरविले आहे. येथून रेफरिंग सेंटर १५० कि.मी. अंतरावर आहे. नांदेड, यवतमाळ, हैदराबाद, नागपूर येथे रुग्ण जातात. याचा सगळा परिणाम आयुष्याच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळेच मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभे करणार आहे. यासाठी ५ कोटींचा निधी लागेल. त्यासाठी अनेकांचा हातभार लागत आहे. सध्या दीड कोटीचा निधी जमा झाला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या स्नुषा डॉ. कांचन जोशी यांनी सहकार्याचा हात पुढे केला. एसेम यांचे चिरंजीव दिवंगत डॉ. अजेय जोशी हे पुण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ होते. डॉ. अजेय यांच्या स्मरणार्थ डॉ. कांचन अजेय जोशी यांनी आपल्या कमाईतून २५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले आहे.

मराठवाड्यात कोणते आरोग्य प्रश्न आहेत?
मराठवाड्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. आणखी १२७ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे. उपकेंद्रेही अपुरे आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाची मल्टीस्पेशालिटी रुग्णालये हवीत. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी आहे. परभणी, उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष सुरू होईल, तो दिवस कोणता, हे माहीत नाही. २००४ मध्ये फिजिओथेरपी महाविद्यालय मंजूर झाले. मात्र, पुढे काहीच नाही. माता व बालमृत्यू दर अधिक आहे. मृत्यूदर, बालजन्मदर, कुटुंबकल्याणमध्ये मागे आहे. मानव विकास निर्देशांकमध्ये मराठवाड्यातील ७ जिल्हे मागे आहेत. नवजात शिशू मृत्यूदर हा विकासदरात अंतर्भूत असतो. तो जास्त असल्याने मराठवाडा विकासदरातही मागे आहे.

आरोग्यमंत्री हे अभ्यासू पाहिजेत. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून आणि सल्ला घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी केली पाहिजे. सर्वसामान्य आजारांचे आरोग्य योजनेत समावेश केला पाहिजे 
-डॉ. अशोक बेलखोडे    

Web Title: Marathwada 25 years behind in health than West Maharashtra, Vidarbha