Marathi Bhasha Din : परभाषिकांचीही बनली मराठी मायबोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 17:08 IST2020-02-27T17:04:37+5:302020-02-27T17:08:45+5:30
मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी बोला ना’असा संदेशही या अमराठी नागरिकांनी दिला आहे.

Marathi Bhasha Din : परभाषिकांचीही बनली मराठी मायबोली
औरंगाबाद : महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहून मराठी आली नाही तरच नवल. आम्ही जरी परभाषिक असलो तरी आता मराठी आमची मायबोली बनली आहे. एवढे आम्ही मराठीमय होऊन गेलो आहोत. आम्हाला शुद्ध मराठीतून बोलताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. मराठी भाषेने अन्य भाषेतील शब्द आपल्यात सामावून घेतले आहेत. एक समृद्ध भाषा आम्ही बोलतो याचा आम्हाला अभिमान आहे. मराठी भाषिकांनी मराठीचा न्यूनगंड बाळगू नये, असे बोल आहेत शहरात राहणाऱ्या अमराठी भाषिकांचे. मराठी भाषा दिन गुरुवारी (दि.२७) साजरा करण्यात येत आहे. मराठी भाषेचा गोडवा एकदा ज्याने चाखला तो मराठीमय होऊन जातो. नोकरी, उद्योगानिमित्ताने परप्रांतांतून नागरिक शहरात आले व येथीलच होऊन गेले. मराठी भाषा दिनानिमित्त ‘मराठी बोला ना’असा संदेशही या अमराठी नागरिकांनी दिला आहे.
मराठीने ओडिसी बांधवांना केले समृद्ध
ओरिसाहून आम्ही नोकरीनिमित्ताने १९७७ मध्ये औरंगाबादेत आलो.ओरिसाहून आलेले ३०० कुटुंबे शहरात स्थायिक े आहेत. आम्ही मराठी शिकलो व आमच्या मुलांनाही मराठी शिकविली व नातवांना शिकवत आहोत. मराठी भाषेने आम्हाला समृद्ध केले आहे. आता आम्हाला कोणी ओरिसाचे म्हणत नाहीत. कारण आमचे सर्व व्यवहार मराठीतच होतात. मराठीच्या संवर्धनासाठी अधिक प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
- कपिल डकवा, अध्यक्ष ओडिया जगन्नाथ रथयात्रा ट्रस्ट
अन्य भाषांतील शब्दांना मराठीने सामावून घेतले
आम्ही हिंदी, उर्दू भाषा बोलत असलो तरीही मराठी आमची मायबोली बनली आहे. मराठी आम्हाला परकी वाटलीच नाही. फुले, शाहू, आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके वाचली. प्र. के. अत्रे, सुरेश भट यांची पुस्तके वाचली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना मराठी भाषेत त्याकाळी उर्दू, पारसी भाषाचेही अनेक शब्द आल्याचे दिसतात. आई सर्व मुलांचा जसा सांभाळ करते तसेच मराठीनेही अन्य भाषेतील शब्दांना आपल्यात सामावून घेतले . -इंजि. वाजेद कादरी, शहराध्यक्ष, जमाते इस्लामी हिंद
पंजाबी माणूस मराठी बोलतो याचे आश्चर्य वाटते
शीख समाज पिढ्यान्पिढ्या महाराष्ट्रात राहत आहे. शिक्षण जरी इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी आम्हाला ‘मराठी’ विषय होताच. आमचे मित्र, शेजारी मराठी बोलणारे असल्याने मराठीची गोडी लागली. व्यवसायामुळे ग्रामीण भागात जावे लागते. मी शेतकऱ्यांशी मराठीतून बोलतो तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटते. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे. आज शीख बांधव मराठी बोलतात. मला मराठीच नव्हे तर पंजाबी, हिंदी, इंग्रजी व तेलगू भाषा येतात. मी भाषेने खूप समृद्ध आहे.
-लव्हली चांडोक
बंगाली भाषिकही मराठीमय झाले
औरंगाबादेत उद्योगानिमित्ताने अनेक बंगाली बांधव आले. आता कोणाची दुसरी, तिसरी पिढी येथे राहत आहे. बंगाली भाषिक असलो तरी आता मराठीमय झालो आहोत.येथे स्थायिक बहुतांश बंगाली बांधवांना मराठी येते. आमचे मित्र मराठीच असल्यामुळे लहानपणी मराठी बोलण्यास पटकन शिकलो. जे मागील काही वर्षात बंगाली बांधव आले असतील त्यांना मराठी फारसे लिहिता येत नाही. मात्र, बोलता येते, समजते.
-प्रितेश चॅटर्जी, अध्यक्ष बंगाली असोसिएशन
मराठी भाषा हेच आमचे भांडवल
माझा जन्म पाकिस्तानात झाला, वयाच्या ११ व्या वर्षांपासून जालन्यात राहत होतो. माझे वय ७९ आहे. महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी भाषा आलीच पाहिजे.मला हिंदी, सिंधी, इंग्रजी व मराठी भाषा येते. आमच्यासाठी मराठी भाषा हेच मोठे भांडवल आहे. आमच्याकडे येणारे ९० टक्के ग्राहक हे मराठीतच बोलतात. आम्ही घरात सिंधी भाषा बोलतो, पण मराठीची एवढी सवय सर्वांना झाली आहे की, कधी कधी मधूनच सिंधीऐवजी मराठीत बोलणे सुरू होते.
-नंदलाल तलरेजा, व्यापारी
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे
आम्ही गुजराती असलो तरी आता आमची मायबोली मराठीच झाली आहे. मराठी ऐश्वर्यसंपन्न आहे. जगभरात इंग्रजी वापरत असल्याने आजकाल पालक मुलांना इंग्रजी शाळेत घालतात. आपली मातृभाषाही आपल्या संस्कृतीचा अस्सल आधार असतो. यामुळे मुलांना मराठी शिकविलेच पाहिजे. मराठी भाषा प्राचीन असतानाही अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करावे लागतात हे दुर्दैवच आहे.
-दिव्यलता गुजराती, निवृत्त शिक्षिका